मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ५ महिन्यानंतरही मार्गदर्शक सूचना नाही !

कार्यवाहीविषयी मराठी भाषा विभागापुढे संभ्रम !

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

मुंबई, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्रशासनाने घेतला खरा; परंतु  अभिजात भाषेचा दर्जा देऊन ५ महिने झाले, तरी त्याविषयी पुढे कसे करावे ? याविषयीची मार्गदर्शक सूचना केंद्रीय सांस्कृतिक विभागाने महाराष्ट्र शासनाला पाठवलीच नाही. मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्यामुळे याविषयीच्या प्रशासकीय कार्यवाहीला अद्याप राज्यात प्रारंभच झालेला नाही. याविषयी नेमके काय करावे ?, याविषयी राज्याच्या मराठी भाषा विभागापुढे संभ्रम निर्माण झाला आहे.

मार्गदर्शक सूचना प्राप्त व्हाव्यात, यासाठी मराठी भाषा विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये केंद्रीय सांस्कृतिक विभागाला पत्रही पाठवले आहे; मात्र केंद्रीय सांस्कृतिक विभागाने यावर उत्तर पाठवलेले नाही. मराठी हा आत्मियतेचा विषय असल्यामुळे केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडून सूचना प्राप्त झाल्या नसल्या, तरी मराठी भाषा विभागाने आपल्या स्तरावर कार्यवाही चालू केली आहे.

कार्यवाहीसाठी समिती नेमणार !

ज्या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे, अशा राज्यांशी संपर्क करून त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले ?, हे मराठी भाषा विभागाने समजून घेतले आहे. अन्य राज्यांकडून माहिती घेऊन यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था, या ४ संस्थांमधून सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थांकडून मराठी भाषा विभागाने नावे मागवली आहेत. नावे आल्यावर समितीची घोषणा होईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जाच्या दृष्टीने राज्यात प्रत्यक्ष कार्यवाही होण्याच्या दृष्टीने ही समिती काम करील.