Aurangzeb Tomb : औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याचे थडगे सरकारने का सांभाळावे ?

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद यांचा प्रश्न !

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलदाबाद येथे औरंगजेबाचे थडगे

मुंबई – जर्मनीमध्ये हिटलरच्या थडग्याचे जतन करण्यात आलेले नाही. जगात क्रूरकर्म्यांची थडगी जतन करण्याची पद्धतच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना छातीचा कोट करून रक्षण करणार्‍या बाजीप्रभु यांची विशाळगडावरील समाधी दुर्लक्षित आहे; मात्र केंद्रीय पुरातत्व विभाग औरंगजेबाचे थडगे सांभाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांना अनन्वित अत्याचार करून मारणार्‍या औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्यांचे थडगे सरकारने का सांभाळावे ?, असा प्रश्न हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून उपस्थित केला.

औरंगजेबाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा व्हिडिओ विविध प्रसारमाध्यमांनीही उचलून धरला असून त्याद्वारे औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये जोर धरत आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या व्हिडिओमध्ये वर्ष २०११ पासून औरंगजेबाच्या कबरीसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून झालेल्या खर्चाचा तपशीलही दिला आहे. ही अधिकृत माहिती अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना केंद्रीय पुरातत्व विभागाकडूनच माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त झाली आहे.

वर्ष २०११ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ६ लाख ५१ सहस्र ९०० रुपये इतका व्यय केला आहे. याविषयी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘क्रूरकर्मा औरंगजेब महाराष्ट्रातच मेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलदाबाद येथे त्याचे थडगे आहे. क्रूरकर्म्यांची थडगी जतन करण्याची जगामध्ये कुठेही प्रथा नाही. विशाळगडावरील बाजीप्रभु यांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी नीट रस्ताही नाही. हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या मराठ्यांच्या समाध्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. हिंदवी स्वराज्याचा निःपात करण्यासाठी आलेल्या खलनायकाच्या थडग्याचे उदात्तीकरण केले जात आहे. अकबरूद्दीन ओवैसी याने मे २०२२ मध्ये तेथे जाऊन औरंगजेबाच्या थडग्याला फुले वाहिली. औरंगजेबासारखा क्रूरकर्म्याचे थडग्याचे अशांसाठी काय स्थान आहे ? हा माझा प्रश्न आहे.

राष्ट्रप्रेमींनी सरकारपर्यंत भावना पोचवाव्यात !

‘छावा’ चित्रपट पाहून ज्यांना ठाऊक नव्हता, त्यांनाही धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आणि औरंगजेबाच्या क्रूरतेचा इतिहास समजला. शंभूराजांची हत्या औरंगजेबाने ज्या क्रूरतेने केली, ते पाहून प्रत्येक हिंदूला वेदना झाल्या. ‘छावा’सारखा चित्रपट असाच येत नाही. ‘लोक हे पहातील’, असे जेव्हा निर्मात्याला वाटते, तेव्हाच चित्रपटाची निर्मिती होते. छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरकर्मा औरंगजेबाने अनन्वित अत्याचार करून मारले, याची चीड सर्वच राष्ट्रप्रेमींच्या मनात आहे. या भावना नागरिकांनी सरकारपर्यंत पोचवायला हव्यात, असेही या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले.