Kashyap Patel : अमेरिकेच्या ‘एफ्.बी.आय.’च्या संचालकपदी भारतीय वंशाचे कश्यप पटेल यांची नियुक्ती !

(एफ्.बी.आय. म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ही संस्था अमेरिकेतील शीर्ष अन्वेषण संस्था आहे.)

कश्यप पटेल

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय वंशाचे कश्यप (काश) पटेल हे अमेरिकी अन्वेषण संस्था ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे संचालक बनले आहेत. अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृह ‘सिनेट’ने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. २० फेब्रुवारीला झालेल्या मतदानात ५१-४९ अशा अल्प बहुमताने या पदावर निवडून आले.

१. ‘डेमोक्रॅटिक पक्षा’च्या खासदारांव्यतिरिक्त, दोन रिपब्लिकन खासदार सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनी पटेल यांच्या विरोधात मतदान केले.

२. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांना भीती आहे की, पटेल डॉनल्ड ट्रम्प यांच्या आदेशांचे पालन करतील आणि त्यांच्या विरोधकांना लक्ष्य करतील.

अमेरिकी लोकांना हानी पोचवणार्‍यांचा जगातील प्रत्येक कोपर्‍यात पाठलाग करू ! – कश्यप पटेल यांचा इशारा

निवडून आल्यानंतर पटेल यांनी सामाजिक माध्यमांवर एक पोस्ट करत म्हटले की, ‘एफ्.बी.आय.’ जगातील प्रत्येक कोपर्‍यात अमेरिकी लोकांना हानी पोचवणार्‍यांचा पाठलाग करील. हा एक इशारा समजा ! अमेरिकी लोकांना पारदर्शक, उत्तरदायी आणि न्यायासाठी वचनबद्ध असलेल्या ‘एफ्.बी.आय.’ची आवश्यकता आहे. आपल्या न्यायव्यवस्थेच्या राजकारणीकरणामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे. आम्ही अशी ‘एफ्.बी.आय.’ उभारू, जिचा लोकांना अभिमान वाटेल.