ध्वनीक्षेपकाचा आवाज नियमापेक्षा अधिक ठेवणार्‍या मुंबईतील मशिदींना पोलिसांकडून नोटीस !

मुंबई – ध्वनीक्षेपकाचा आवाज नियमापेक्षा अधिक ठेवणार्‍या मुंबईतील मशिदींना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येत आहेत. नुकतीच पोलिसांनी घाटकोपरमधील चिरागनगर येथील जामा मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या आवाजाची अजानच्या वेळेत जाऊन पडताळणी केली. या वेळी आवाज ५५ डेसीबलहून अधिक आढळला. यानंतर पोलिसांकडून जामा मशिदीच्या विश्वस्तांना आवाजाची मर्यादा अल्प करण्याविषयीची नोटीस दिली आहे.

जामा मशिदीवरून दिवसातून ५ वेळा होणार्‍या अजानच्या वेळी आवाजाची मर्यादा अधिक असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून या तक्रारी होत असूनही कारवाई होत नव्हती. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या वेळी दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी ही कारवाई चालू केली आहे. चिरागनगर येथील जामा मशिदीसह मुंबईतील विविध भागांमधील मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाचीही पोलिसांकडून पडताळणी चालू करण्यात आली आहे. रहिवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ५५ डेसीबलहून अल्प असावी, अशी ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याद्वारे मर्यादा देण्यात आली आहे. पोलिसांकडून डेसीबल मीटरद्वारे आवाजाची चाचपणी करून ५५ डेसिबलहून अधिक आवाज असलेल्या मशिदींना नोटीस पाठवण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर चिरागनगर येथील काही मुसलमानांनी ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे, तसेच निवडणुकीत राजकीय लाभासाठी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

… तर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे निघून जावे ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसायमंत्री

न्यायालयाच्या आदेशाचे पालन सर्वांनी करायला हवे. मशिदींवर ध्वनीक्षेपक लावणार्‍यांनीही आवाजाची मर्यादा पाळायला हवी. नियमांचे पालन करायचे नसेल, तर त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे निघून जावे, असे वक्तव्य बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी २ दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केले. पत्रकारांनी न्यायालयाने ध्वनीक्षेपकाविषयी दिलेल्या निर्देशावर विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणे यांनी वरील उत्तर दिले.