|

प्रयागराज – महाकुंभात हिंदु राष्ट्र आणि सनातन बोर्ड (मंडळ) यांची स्थापना करण्याची मागणी जोर धरल्यानंतर आता भारतात भगवान श्रीरामाची मुद्रा असलेल्या नोटा चलनात आणाव्यात, अशी मागणी येथील महर्षी योगी संस्थेने केली आहे. डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान आणि ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे (‘आर्.बी.आय’चे) गर्व्हनर असतांना त्या वेळी अशी मागणी करण्यात आली होती; मात्र त्या वेळी आर्.बी.आयने सांगितले होते की, भारतात २ प्रकारचे चलन चालू शकत नाही. नेदरलँड्समध्ये श्रीरामाचे छायाचित्र डिझाइन करून ते चलनात आणण्यासाठी ज्या संस्थेने ‘द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस’ला सहकार्य केले होते, त्याच संस्थेने या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. आता या संस्थेशी जोडलेले वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आर्.बी.आय.ला भेटण्याची योजना आखत आहेत. मोदी सरकार या मागणीची नोंद घेऊ शकते, अशी आशा या संस्थेला आहे. श्रीरामाचे चित्र असलेले हे चलन हॉलंड, जर्मनीसह ३० देशांमध्ये वापरले होते. ही संस्था सर्वांत श्रीमंत आध्यात्मिक संस्था असून ती महर्षी महेश योगीशी संबंधित आहे. या संस्थेशी संबंधित महर्षी संस्थानचा आश्रम प्रयागराज येथील महाकुंभातील अरेलमध्ये आहे.
संस्थेचे प्रमुख ब्रह्मचारी गिरीश महाराज म्हणाले, ‘‘सर्व लोक रुपया, डॉलर, युरो यांवर अधिक चर्चा करतात. प्रत्येकाला संपत्तीची आवश्यकता असते. तथापि महर्षी महेश योगी यांना वाटले की, दिवसभर लोक राम-राम कसे म्हणतील ? त्यामुळे त्यांनी राम नावाचे चलन चालवण्याचा निर्णय घेतला. यावर पुढे जाऊन तज्ञांकडून उपदेश घेण्यात आला. राममुद्रा प्रथम नेदरलँड्समध्ये छापली गेली. आमची संस्था त्यात सहभागी होती. १० डॉलरच्या समान १ राम मुद्राची किंमत ठेवली गेली. त्यानंतर राममुद्रा हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियासह ३० देशांमध्ये चालली. हा एक मोठा आणि चांगला प्रयोग होता. बर्याच लोकांना तो आवडला. त्यानंतर भारतात असे चलन चालवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. आता पुन्हा श्रीरामाची मुद्रा असलेले चलन लागू करण्याविषयी चर्चा चालू झाली आहे. संस्थेतील वित्तपुरवठा पहाणारे ज्येष्ठ लोक सरकारशी चर्चा करतील. आम्ही सरकारला ही मुद्रा कशी उपयोगी आहे, ते सांगणार आहे. हे एक विकास चलन आहे, जे निश्चित वेळेसाठी आहे.’’