Delhi Railway Station Stampede : नवी देहली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ प्रवासी ठार !

  • महाकुंभक्षेत्री जाण्यासाठी विशेष रेल्वेगाडीची उद्घोष्णा झाल्यामुळे झाला अपघात !

  • २० हून अधिक लोक घायाळ !

नवी देहली – नवी देहली रेल्वे स्थानकावर १५ जानेवारीच्या रात्री उशिरा रेल्वे गाडीत चढण्यासाठी झालेल्या चढाओढीत चेंगराचेंगरी झाली. यात १८ प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार प्रयागराजमध्ये चालू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाणार्‍या प्रवाशांनी फलाट क्रमांक १४ आणि १५ वर गर्दी केली होती. फलाट क्रमांक १४ वर मगध एक्सप्रेस, तर १५ वर उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस आधीपासून उभ्या होत्या. प्रयागराजकडे जाणार्‍या दोन गाड्या उशिरा धावत असल्याने फलाटांवर प्रवासी थांबले होते. अशात एका विशेष गाडीची उद्घोषणा झाल्याने तिच्याकडे धावत असतांना प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी अपघातावरून देहली पोलीस आणि रेल्वे प्रशासन एकमेकांवर आरोप करत आहेत.

चेंगराचेंगरीपूर्वीची परिस्थिती अशी…!

१. प्रवासी प्रयागराजला महाकुंभक्षेत्री जाणार्‍या रेल्वेगाड्यांची वाट पहात होते.

२. प्रयागराजला जाणार्‍या २ गाड्या आधीच उशिराने धावत होत्या. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाविक फलाट क्रमांक १४ आणि १५ वर वाट पहात होते.

३. अचानक रेल्वे प्रशासनाने नवी देहलीहून प्रयागराजसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची घोषणा केली. घोषणा होताच प्रवाशांनी फलाट क्रमांक १४ ते १६ वरून धावण्यास आरंभ केला. यामुळे चेंगराचेंगरी झाली.

४. आधी पोचण्यासाठी लोक एकमेकांना अक्षरश: तुडवत गेले. अनेक लोक फलाटांच्या पायर्‍या आणि रेल्वेगाडीच्या रुळांवरही पडले.

पोलीस अधिकार्‍यांची वक्तव्ये !

रेल्वे पोलीस उपायुक्त के.पी.एस्. मल्होत्रा यांनी सांगितले की, प्रयागराजला जाण्यासाठीच्या दोन गाड्यांची वाट पहात तब्बल ८ ते १० सहस्र प्रवासी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. त्यातच एका नवीन रेल्वेची घोषणा झाली. त्या गाडीतून जाण्यासाठीही आधीपासूनच ६ सहस्र प्रवासी तेथे उपस्थित होते. अशा परिस्थितीत फलाटांवर क्षमतेपेक्षा अत्याधिक लोक जमले होते. १५-२० मिनिटांच्या आतही ही दुर्दैवी घटना घडली.

अन्य एका अधिकार्‍याने सांगितले की, दुपारी ३ वाजल्यापासून रेल्वे स्थानकावरील परिस्थिती बिघडू लागली होती. गर्दीत लोकांना पुढे किंवा मागे जाताही येत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना गाडी चुकण्याची भीतीही वाटत होती. चेंगराचेंगरीचे हे आणखी एक कारण होते.

प्रत्यदर्शींचे मत !

घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडून कोणतीही व्यवस्था नव्हती. केवळ काही पोलीस दिसत होते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या मनाप्रमाणे करत होते. जर फलाटावर पुरेसे पोलीस असते, तर कदाचित् हा अपघात टळला असता.

संपादकीय भूमिका

  • चेंगराचेंगरीच्या वारंवार घडत असलेल्या घटना पहाता यामागे काही षड्यंत्र आहे का, हे पडताळण्यासह भारतीय जनतेतील बेशिस्तपणालाही उत्तरदायी धरले पाहिजे ! यासमवेत अशा घटना घडू नयेत, यासाठी उत्तरदायी अधिकार्‍यांवर कठोरात कठोर कारवाईही झाली पाहिजे !
  • लक्षावधी लोक एकाच वेळी अशा यात्रांना जात असतात. अशा प्रसंगी त्यांच्या येण्या-जाण्याचे योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे. यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी प्रयत्न करणे आवश्यक !