हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक उपेक्षितच !

  • १०४ कोटी रुपये प्राप्त; पण काम कासवगतीने    

  • संपादनाचा निर्णय नाहीच

हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बलीदान देणारे थोर क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचे काम आजही धीम्या गतीने चालू आहे. सरकारने २५४ कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. त्यापैकी मागील अर्थसंकल्पात १०४ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला; मात्र प्रत्यक्षात चालू झालेले काम धीम्या गतीने चालू असून संपादनाविषयी अजूनही निर्णय झाला नाही. केवळ बैठकांचे सत्र चालू आहे. सरकार या थोर देशभक्ताच्या स्मारकारकडे अजूनही दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. (देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्‍या क्रांतीकारकांच्या स्मारकाची अशी स्थिती असणे, हे प्रशासन त्यांच्याप्रती गंभीर नसल्याचेच द्योतक आहे ! त्यांनी केलेल्या पराक्रमाचे, त्यागाचे स्मरण जागृत ठेवण्यासाठी, भावी पिढीला प्रेरणा देणार्‍या क्रांतीकारकांच्या स्मृतीस्थानाचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, ही इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक)

राजगुरुनगर शहरात होणार्‍या हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळ वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठी २ वर्षांपूर्वी विकास आराखडा झाल्यानंतर परिसरातील ४५ मालमत्ता धारकांचे पर्यायी पुनर्वसन प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी केवळ प्रावधान झाले आहे. प्रत्यक्षात संपादनासाठी काहीच हालचाली होत नाहीत. विकासकामाविषयी आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यामुळे हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाविषयी अजूनही हेळसांड होत आहे. हुतात्मा राजगुरु यांची जयंती-पुण्यतिथी आली की, अधिकारी आणि राजकीय नेते जागे होतात. प्रत्येक वर्षी नव्या घोषणा केल्या जातात. पुढे मात्र ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे कारभार चालत आहे.

संपादकीय भूमिका :

क्रांतीकारकांच्या स्मारकांच्या संवर्धनातून नव्या पिढीवर राष्ट्रप्रेमाचा संस्कार होणार, हे निश्चित !