Thiruparankundram Temple Row : मद्रास उच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर हिंदु संघटनांनी केले मोठे आंदोलन  !

मदुराई (तमिळनाडू) येथील तिरुपरंकुंद्रम् टेकडीचे प्रकरण

आंदोलनातील सहभागी विशाल हिंदू जनसमुदाय

मदुराई (तमिळनाडू) – येथील पवित्र तिरुपरंकुंद्रम् टेकडीवर मुसलमानांना  शिजवलेले मांस वाहून नेण्याची अनुमती दिल्यानंतर हिंदु संघटनांनी मोठा निषेध केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ४ फेब्रुवारी या दिवशी येथील पलक्कनाथम् येथे सहस्रो हिंदूंनी निदर्शने केली. प्राचीन मुरुगन मंदिर येथील तिरुपरंकुंद्रम टेकडीवर आहे; परंतु मुसलमानांनी संपूर्ण टेकडी वक्फची मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.

१. या टेकडीवर मुरुगन मंदिराच्या अगदी शेजारी मुसलमानांनी एक दर्गा बांधला आहे. त्यांना तिथे बकरी आणि कोंबडी कत्तलीसाठी घेऊन जायच्या आहेत. गेल्या काही काळात याला पुष्कळ विरोध झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बलीदानासाठी जिवंत बकरी किंवा कोंबडी घेऊन जाण्यास बंदी घातली. तथापि, मुसलमान तेथे शिजवलेले मांस घेऊन जाऊ शकतात आणि ते खाऊ शकतात. यामुळे हिंदु समुदायातील लोक संतप्त झाले आहेत.

२. हिंदु संघटनांच्या निषेधाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आणि हिंदु समुदायातील लोकांना प्रवेश बंदी घातली. यानंतर हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेने या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाविरुद्ध निषेध करण्याची अनुमती मागितली. न्यायालयाने ४ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत निषेध करण्यास अनुमती दिली आणि प्रशासनाला त्यासाठी सिद्धता करण्याचे आदेश दिले.

३. न्यायालयाकडून अनुमती मिळाल्यानंतर हिंदु मुन्नानी, हिंदू फ्रंट, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप यांसह ५० हून अधिक हिंदु संघटनांनी याचा निषेध केला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे फडकावले आणि हिंदु देवतांच्या नावाने घोषणा दिल्या. या आंदोलनाच्या वेळी ३ सहस्र ५०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.

४. या काळात इंडियन युनियन मुस्लिम लीगचे खासदार नवाज कानी यांनी पोलीस अधिकार्‍यांशी संवाद साधला. कानी म्हणाले की, शेळ्या आणि कोंबड्या टेकडीच्या माथ्यावर नेणे, त्यांचा बळी देणे, त्यांना शिजवणे आणि खाणे ही प्रक्रिया पुन्हा चालू  करावी. ही वक्फची मालमत्ता आहे आणि प्रत्येक मुसलमानाला त्याच्या इच्छेनुसार येथे पूजा करण्याचा अधिकार आहे. टेकडीच्या माथ्यावर प्राण्यांचा बळी देणे, ही जुनी परंपरा आहे आणि ती चालू राहिली पाहिजे.

५. मुसलमानांचा दावा आहे की, टेकडीवरील मुरुगन मंदिराजवळील ‘सिकंदर बदुशाह थोळुगाई पल्लीवासल’ हा दर्गा सुलतान सिकंदरने सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधला होता.

६. द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) पक्षाचे आमदार अब्दुल समद यांनी २१ जानेवारी या दिवशी टेकडीचे अनौपचारिक सर्वेक्षण केल्याचा दावा केला आणि ती मुसलमानांची असल्याचे सांगितले.

काय आहे इतिहास ?

येथे केवळ प्राचीन मुरुगन मंदिरच नाही, तर दुसर्‍या शतकातील जैन लेणी देखील आहेत. त्यावर ब्राह्मी लिपीतील शिलालेखही आहेत. या टेकडीवर असलेल्या जैन लेण्यांनाही मुसलमानांनी हिरवा रंग दिला होता. याखेरीज येथे एक शिवमंदिर देखील आहे. आता मुसलमान या प्राचीन आणि पवित्र टेकडीचे अधिकृत नाव ‘सिकंदर टेकडी’ असे ठेवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न गेल्या अनेक दशकांपासून चालू आहे. वर्ष १९३१ मध्ये मुसलमानांनी दावा केला होता की, ही टेकडी मुसलमानांची मालमत्ता आहे आणि तिला ‘अलेक्झांडर हिल्स’ असे नाव दिले होते. १२ मे १९३१ या दिवशी प्रिव्ही कौन्सिलने या प्रकरणाची नोंद घेऊन ‘तिरुपरंकुंद्रम् मंदिराने टेकडीच्या रिकाम्या भागांवर ऐतिहासिक नियंत्रण असल्याचे सिद्ध केले आहे आणि ते पिढ्यान्पिढ्या त्यांची मालमत्ता आहे’, असा निर्णय दिला होता