Shankaracharya Nischalanand Sarasvati : ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांच्या संकेतावरून मी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करतो !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती, पुरी मठ

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – देश, काळ आणि परिस्थितीनुसार आम्ही बोलतो. कुणाकडेही मागणी करत नाही, तर उद्घोष करतो. आमची वाणी भगवंतापर्यंत पोचते. सव्वातीन वर्षांपासून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, असे मी म्हणत आहे. ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांचा मला जो संदेश मिळतो, तो मी प्रसारित करत आहे, असे वक्तव्य पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या वतीने महाकुंभमध्ये ‘भारत भव्य बनायेंगे, हम हिंदु राष्ट्र बनायेंगे’, असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी विचारले असता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी वरील उद्गार काढले.

या वेळी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटना असेपर्यंत भारत हिंदु राष्ट्र कसे होणार ? राज्यघटनेतील कलम २५ चा सन्मान केला असता, तर जैन आणि शीख यांनी स्वत: ला हिंदु म्हणवले असते. आरक्षण मिळवण्यासाठी कुणीही स्वत:ला अल्पसंख्य घोषित केले नसते.’’

महाकुंभामध्ये धर्मसंसदेत संतांनी सनातन बोर्डाची मागणी करून त्याचे संचलन चारही पिठाच्या शंकराचार्यांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारले असता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती म्हणाले,‘‘शंकराचार्य कोणत्याच राजकीय पक्षाचे धार्जिणे नसावेत. विश्‍वाच्या ४ भागांचे दायित्व शंकराचार्यांकडे असते, त्यांच्या नेतृत्वात मठ, मंदिरे सुरक्षित रहातात. आम्ही सनातन बोर्डाची मागणी करत नाही. शंकराचार्यंनी प्रामाणिकपणे कार्य करावेे.’’

सभेत हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

या वेळी सभेला उपस्थित मान्यवरांनी ‘हम हिंदु राष्ट्र बनायेंगे, भारत भव्य बनायेंगे’, धर्माचा विजय व्हावा, अधर्माचा नाश व्हावा’, या घोषणा उत्स्फूर्तपणे दिल्या.