
प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – सनातन मूळ असणारे हिंदु राष्ट्र घटनात्मक रूपात निर्माण झाल्यास सर्व समाजाचा उद्धार होईल. हिंदु राष्ट्र स्थापन झाले, तर सर्वच सुरक्षित रहातील आणि सर्वांचा विकास होईल, असे मार्गदर्शक उद्गार आसाम येथील वेदप्रणा मा आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटीचे समन्वयक स्वामी स्वरूपानंद यांनी येथे केले. महाकुंभक्षेत्री सनातन संस्थेच्या वतीने मोरीमुक्ती चौक, सेक्टर १९ येथे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी निर्गुणानंद पुरी यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
स्वामी स्वरूपानंद म्हणाले, ‘‘कुंभक्षेत्रात मी अनेक ठिकाणी गेलो; परंतु सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहून मला अत्यानंद झाला. सनातन संस्थेकडून हिंदु राष्ट्राची मागणी होत आहे. राष्ट्राची भौगोलिक सीमा असते. सनातनला कोणताही विशेष देश सीमित करू शकत नाही; कारण सनातनच्या नियमावलीने सृष्टी चालत आहे. सनातनमुळेच सर्वांचे रक्षण आणि संवर्धन होत असून सर्वांना समृद्ध करत आहे. सनातन संस्थेचे साधक ज्या निष्ठेने प्रदर्शनाची माहिती सांगत आहेत, हे पाहून मन प्रसन्न झाले. धर्माचरण कसे करावे ? याची सर्व माहिती सर्वसामान्य जनतेला सनातनचे हे प्रदर्शन पाहून मिळेल.’’ सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून कार्य वृद्धींगत होण्यासाठी त्यांनी आशीर्वाद दिले.
शिस्त आणि संघटितपणा यांमुळे आकर्षित करणारे सनातनचे आश्रम ! – स्वामी निर्गुणानंद पुरी
आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथे असणारी शिस्त आणि संघटितपणा या गोष्टी मला नेहमीच आकर्षित करतात. हिंदु धर्मातील धर्माचरण आणि धर्मपालन यांविषयी छोट्या कृती कशा कराव्यात, यांची माहिती देणारे अतिशय सुंदर प्रदर्शन सनातन संस्थेच्या वतीने कुंभमेळ्यात लावले आहे.