US Pauses Foreign Assistance To Pakistan : अमेरिकेने साहाय्य थांबवल्याने पाकचे अनेक प्रकल्प ठप्प !

(डीप स्टेट म्हणजे एखाद्या देशाला सरकारी यंत्रणा नव्हे, तर एका षड्यंत्राच्या अंतर्गत छुप्या पद्धतीने हाकणारी सर्व स्तरांवर कार्यरत देशविरोधी यंत्रणा !)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व पाकचे पंतप्रधान शहबाज़ शरीफ़

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानंतर पाकला दिल्या जाणार्‍या साहाय्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून या साहाय्याचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. या आदेशामुळे पाकमध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित ५ योजना ठप्प झाल्या आहेत. याखेरीज आरोग्य, कृषी, अन्न सुरक्षा, पूर, हवामान आणि शिक्षण यांच्याशी संबंधित अनेक प्रकल्पही ठप्प झाले आहेत. यांतील काही प्रकल्प कायमचे बंद होण्याची शक्यता आहे. मागील २० वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३२ अब्ज डॉलरचे आर्थिक साहाय्य केले आहे.

१. वर्ष २०२३ मध्य अमेरिकेने १५८ देशांना सुमारे ३ लाख ८९ सहस्र कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले होते; मात्र ट्रम्प यांच्या आदेशानंतर परराष्ट्र धोरणाचा आढावा तयार होईपर्यंत परदेशात देण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या साहाय्यावर ९० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

२. पाकिस्तानकडे सध्या केवळ १६ अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी शिल्लक आहे. सप्टेंबर २०२४ मध्येच पाकिस्तान सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ७ अब्ज डॉलर्सचे साहाय्य मिळाले. त्याच वेळी नाणेनिधीने वर्ष २०२५ साठी पाकच्या विकास दराचा अंदाज ३ टक्क्यांपर्यंत अल्प केला आहे.

बांगलादेश आणि नेपाळ यांचेही आर्थिक साहाय्य रोखले !

पाकिस्तानप्रमाणे बांगलादेश आणि नेपाळ यांनाही अमेरिकेकडून मोठे आर्थिक साहाय्य केले जात होते. डिसेंबर २०२४ च्या आकडेवारीनुसार बांगलादेशाला ४९ कोटी डॉलरचे साहाय्य केले होते. बांगलादेशात खाद्य, शिक्षण, सुरक्षा आणि विकास यांसाठी अमेरिकेवर अवलंबून रहावे लागते.

नेपाळच्या विकास कामांमध्ये अमेरिकेचे साहाय्य घेणारा तो जगातील १९ वा देश आहे. नेपाळच्या आरोग्य, शिक्षण, कृषी, विकास, आर्थिक विकास, मानव साहाय्य, महिला आणि बालकल्याण यांसारख्या क्षेत्रात अमेरिका साहाय्य करते. ट्रम्प यांच्या आदेशाने नेपाळलाही फटका बसला आहे.

संपादकीय भूमिका

  • आधीच भिकेला लागलेल्या पाकच्या कंबरड्यात लाथ बसल्यासारखीच ही घटना असल्याने पाकला आतातरी सद्बुद्धी होईल का, याचीही अपेक्षा करता येणार नाही !
  • अमेरिकेतील भारतविरोधी ‘डीप स्टेट’ने भारताच्या शत्रूंना पोसण्याचे जे काम केले होते, ते आता ट्रम्प सरकार थांबवत आहे, हा चांगला पालट असला, तरी अमेरिकेपासून सावध रहाणेच आवश्यक आहे !