Baba Vanga Prediction : भारत जागतिक महासत्ता बनून जगाला मार्गदर्शन करेल !

बल्गेरियातील महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी करून ठेवलेले भाकीत !

नवी देहली – बल्गेरियातील महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी अनेक भाकिते वर्तवली आणि त्यातील बहुतेक खरी ठरली आहेत. त्यांनी भारताविषयी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगून ठेवले आहे की, ‘भारत महासत्ता बनेल आणि जगाला मार्गदर्शन करेल.’ यातून स्पष्ट होते की, भारत केवळ विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसणार, एवढेच नाही, तर जगाचे नेतृत्वही करेल.

खरी ठरलेली अन्य भाकिते !

१. कुरस्क पाणबुडी दुर्घटना (वर्ष २०००) : ‘कुरस्क’ पाण्याखाली जाईल आणि संपूर्ण जग त्यावर दु:ख व्यक्त करेल, असे बाबा वेंगा म्हणाल्या होत्या. खरोखरच वर्ष २००० मध्ये रशियन पाणबुडी ‘कुरस्क’ बुडाली. त्यात ११८ नौदल अधिकारी होते. सर्वांनाच प्राणापासून मुकावे लागले. त्यावेळी या घटनेची पुष्कळ चर्चा झाली होती.

२. ९/११ चे अमेरिकेवरील आक्रमण (वर्ष २००१) : पोलादी पक्ष्यांच्या आक्रमणानंतर अमेरिकन जुळे बंधू पडतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर आतंकवादी आक्रमण झाले. येथील ‘ट्विन टॉवर्स’वर विमानाची धडक देण्यात आली होती. हे आक्रमण ‘अल्-कायदा’ या आतंकवादी संघटनेने केले होते.

३. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील : ‘अमेरिकेचा ४४ वा राष्ट्राध्यक्ष हा आफ्रिकन-अमेरिकन वंशाचा असेल’, असे बाबा वेंगा यांनी वर्तवले होते. वर्ष २००८ मध्ये बराक ओबामा हे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले आणि दोन कार्यकाळ, म्हणजेच ८ वर्षे राष्ट्राध्यक्ष राहिले.

४. सीरियातील इस्लामी युद्ध (वर्ष २०१४) : सीरियामध्ये एक मोठे इस्लामी युद्ध चालू होण्याची शक्यताही वेंगा यांनी वर्तवले होते. वर्ष २०१४ च्या जवळपास ‘इस्लामिक स्टेट’चा उदय झाला आणि याच काळात मध्य पूर्वेत युद्ध पेटले.