Uday Samant on Chhaava Controversy : ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होणारे दृश्य काढले ! – मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत

इतिहासप्रेमींनी केलेल्या विरोधाचा परिणाम !

मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत

मुंबई – अभिनेते विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि राणी येसूबाई यांच्यातील लेझीम नृत्याच्या संदर्भातील दृश्य त्यात चित्रीत केले असल्याने काहींनी त्यावर आक्षेप घेतला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याविषयी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. चित्रपटाच्या स्वातंत्र्याच्या वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. त्यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. या विरोधानंतर चित्रपटातील वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती निर्माते आणि दिग्दर्शक यांनी दिली, असे राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, ‘‘धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे, ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा, यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत; मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याविषयी अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ञ आणि जाणकार यांंना आधी दाखवण्यात यावा, त्याशिवाय प्रदर्शित करू नये, अशी आमची भूमिका आहे.’’

  • दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट !

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लेझीम नृत्य काढण्यास सांगितले !

  • छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळले असतील, असे वाटल्याने नृत्य चित्रीत  केल्याचे स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व ‘छावा’ चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर

लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळले नसतील कशावरून ? असा प्रश्‍न होता. छत्रपती संभाजी महाराजांनी बुर्‍हाणपूरवर आक्रमण केले होते. तेथून जिंकून ते रायगडावर आले होते. या वेळी ते केवळ २० वर्षांचे होते. २० वर्षांचा राजा लेझीम खेळलाही असेल. त्याच चुकीचे काय ? असे मला वाटत होते; म्हणून ते नृत्य चित्रित केले; पण महाराजांनी लेझीम खेळल्यामुळे जर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असतील, तर ते दृश्य काढून टाकण्यात येईल. लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा किंवा महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे ते दृश्य आम्ही नक्कीच काढून टाकू. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ऐतिहासिक विषयावर पुष्कळ वाचन असल्याने त्यांचा सल्ला घेण्याचे आम्ही ठरवले. त्यांनीही लेझीम नृत्य काढण्यास सांगितले, असे विधान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केले.