सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे झालेल्या ‘राष्ट्रीय समष्टी नेतृत्व’ शिबिरात साधकांना आलेल्या अनुभूती

१९ ते २२.९.२०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘राष्ट्रीय समष्टी नेतृत्व’ शिबिर पार पडले. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार.

सौ. निवेदिता जोशी

१ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी भाव ठेवल्याने चैतन्याची अनुभूती येणे

१ अ १. दोन दिवसांचे जागरण झाल्याने ‘शिबिरामध्ये ग्लानी येईल’, असे वाटणे : ‘१७.९.२०२४ ला रात्री ११ वाजता मी आणि सहसाधिका नंदुरबार येथून गोवा येथे जाण्यासाठी निघालो. आम्हाला १८.९.२०२४ या दिवशी सकाळी ७ वाजता सुरत येथून रेल्वेने निघायचे होते. गोवा येथील आश्रमात पोचायला आम्हाला रात्रीचे २ वाजले. त्या वेळी आमच्या मनात विचार आला, ‘आपले कालचेही जागरण झाले आहे आणि आजचेही जागरण आहे. त्यामुळे झोप न मिळाल्यामुळे आपल्याला शिबिरामध्ये ग्लानी येईल.’

१ अ २. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती भाव ठेवल्यामुळे २ रात्रींची झोप केवळ ३ घंट्यांत पूर्ण होणे : रात्री गुरुदेवांच्या कृपेने ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ माझ्या मस्तकावरून हात फिरवून मला थोपटत आहेत. त्यांचा चैतन्यदायी पदर माझ्या चेहर्‍यावर असून मी आईच्या कुशीतच आहे’, असा भाव ठेवण्याचे मला सुचले. तेव्हा रात्रीचे अनुमाने २.२५ झाले असतील. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अनुसंधानात राहिल्यामुळे ‘झोप केव्हा लागली ?’, हे मला कळलेच नाही. स्वप्नातही ‘त्या माझ्याजवळच आहेत’, असे मला दिसत होते. सकाळी ६ वाजता मला जाग आली. तेव्हा मला जराही थकवा जाणवत नव्हता. माझी २ रात्रींची झोप केवळ ३ घंट्यांत पूर्ण झाली.

या अनुभूतीतून ‘काळ हा ईश्वराच्या आधीन असतो. ज्या वेळी शिष्याला जे आवश्यक असते, ते देव पुरवतच असतो. आपण केवळ शरणागत होऊन सेवा करायची आहे’, हे मला शिकायला मिळाले.

शिबिरात मला सहभागी होता आले, यासाठी माझ्याकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली. हे सर्व अनुभवायला देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. श्री. रामचंद्र केवट, चंद्रपूर 

श्री. रामचंद्र केवट    

२ अ. शिबिरामुळे जीवनात आंतरिक पालट होणे : ‘मला या शिबिराला बोलावले, यासाठी मी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त करतो. या कालावधीत माझे संपूर्ण जीवनच पालटले. मला माझ्यात आंतरिक पालट झाल्याचे जाणवत आहे. ‘जीवन जगण्याचा खरा अर्थ काय आहे ?’, हे मला आता समजले आहे. मी स्वतः यापूर्वीही हिंदूसंघटनासाठी कार्य करत होतो; परंतु आता तीच गोष्ट सेवेच्या रूपात मी ईश्वरचरणी समर्पित करणार आहे. पूर्वी ‘मी करतो’, असा माझ्यात कर्तेपणा होता; परंतु आता ‘भगवंताने मला निवडले असून तोच माझ्याकडून कार्य करून घेत आहे’, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला त्यांच्या चरणांजवळ घेऊन माझ्या संपूर्ण कुटुंबावर कृपा केली आहे. ‘त्यांचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहो’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि ‘त्यांनी मला येथे बोलावून आमच्यावर स्नेहाचा जो वर्षाव केला’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २३.९.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक