१. नामजप करत असतांना तोंड लाळेने पूर्ण भरून जाणे आणि ‘ही अनुभूती आपतत्त्वाशी संबंधित आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगणे

‘मी काही दिवसांपूर्वी नामजप करत असतांना माझ्या आज्ञाचक्राजवळ मला संवेदना जाणवू लागल्या. माझे ध्यान लागले आणि त्याच वेळी माझ्या तोंडामध्ये वरील बाजूने पाण्याचे थेंब पडू लागले. काही वेळाने माझे तोंड लाळेने पूर्ण भरून गेले आणि ‘माझ्या तोंडातून पाणी बाहेर पडेल कि काय’, असे मला वाटू लागले. मला असे एकाच आठवड्यात २ – ३ वेळा जाणवले. मी याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगितले. त्या वेळी त्या मला म्हणाल्या, ‘‘ही आपतत्त्वाशी संबंधित अनुभूती आहे.’’
२. ‘अज्ञात शक्ती फुप्फुसांचा भाता चालवत आहे’, या संदर्भात जाणवलेली सूत्रे
२ अ. एकदा मी श्वासाला जोडून नामजप करत असतांना मला जाणवले, ‘एक सूक्ष्म धागा सहस्रारातून गेला असून त्याच्या एका टोकाला दोन्ही फुप्फुसे बांधली गेली आहेत.
२ आ. या धाग्याचे दुसरे टोक एका अज्ञात शक्तीच्या हातामध्ये असून ती अज्ञात शक्ती फुप्फुसाचा भाता चालवत आहे.
२ इ. त्या शक्तीने धागा सैल सोडला असता फुप्फुसांमध्ये हवा भरली जात आहे आणि तो ओढला असता हवा बाहेर पडत आहे.’
२ ई. ‘ईश्वरेच्छेनेच सर्वकाही घडते’, याची जाणीव होणे : ‘आपला श्वासोच्छ्वास आपल्या हातांमध्ये नसून तो ईश्वरेच्छेनुसार चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘हे सर्वकाही त्याचेच असून सर्व क्रिया त्याच्या (ईश्वराच्या) इच्छेनुसार होतात. त्या ठिकाणी ‘मी आणि माझे’ असे काही नसून सर्वकाही त्याचेच (ईश्वराचे) आहे. तोच सर्व करतो’, हे मला प्रकर्षाने जाणवले. त्याचक्षणी ‘मी करतो’, हा माझा अहं गळून पडण्यास साहाय्य झाले.
३. ‘शरिरातील प्रत्येक पेशी नामजप करत आहे’, असे जाणवणे
मी काही वेळा नामजप करत असतांना ‘शरिरातील पेशी न् पेशी नामजप करत आहे, म्हणजे प्रत्येक पेशी चिपळ्या वाजवत आहे’, असे मला जाणवते. त्या वेळी ‘त्या भावस्थितीतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटत असते.
‘ईश्वरच सर्वकाही करतो’, हे मी वाचले आणि ऐकले होते. ईश्वराने हे सर्व अनुभूतीच्या माध्यमातून प्रत्यक्ष जाणवून दिल्यामुळे मी ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (१९.४.२०२४)
|