बांधकाम चालू असलेल्या शाळेवर जमावाने केले आक्रमण
शिलाँग (मेघालय) – रामकृष्ण मिशन शाळेच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर मेघालयातील मावकिनरे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २० जानेवारी या दिवशी अनुमाने २५० लोकांच्या जमावाने बांधकाम चालू असलेल्या शाळेवर आक्रमण करून ती पाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलीस आणि जमाव यांमध्ये झटापट झाली. हिंसक होत असलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या संघर्षात पोलीस आणि रहिवासी असे अनेक लोक घायाळ झाले.
१. वर्ष २०२२ पासून येथे शाळेचे बांधकाम चालू आहे. ही भूमी पोलीस ग्राम परिषदेने रामकृष्ण मिशनला दान केली होती. पोलीस अधीक्षक विवेक सीम म्हणाले की, आता या भूमीवरून २ गावांमध्ये वाद चालू आहे. दुसर्या गावातील लोकांनी या मालमत्तेवर दावा केला आहे.
२. शाळेची भूमी ग्राम परिषदेची आहे, ज्यावर मावकिनरे आणि मावलिन या २ गावांचा सामुदायिक हक्क आहे. जेव्हा जमीन रामकृष्ण मिशनला देण्यात आली, तेव्हा दोन्ही गावांच्या प्रमुखांनी त्यावर सहमती दर्शवली. आता मावलिन गावातील लोकांनी ही भूमी परत मागितली आहे.