Raja Bhaiya In Mahakumbh 2025 : आपण (हिंदू) स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नसल्याने एका झटक्यात अर्धे नष्ट होऊ ! – आमदार राजा भैय्या, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशातील आमदार राजा भैय्या यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांचे ‘१५ मिनिटांसाठी..’चे विधान योग्य असल्याचे सांगत हिंदूंचे टोकले कान !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘जर १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केले, तर १०० कोटी हिंदूंना दाखवून देऊ’, असे विधान ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमचे – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. त्यावर जनसत्ता दल लोकशाही पक्षाचे अध्यक्ष असणारे उत्तरप्रदेशातील आमदार रघुराज प्रताप सिंह उपाख्य राजा भैय्या यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की, जर आपण भाग्यनगरच्या नेत्याच्या विधानाचा गांभीर्याने विचार केला, तर त्यांनी जे सांगितले ते बर्‍याच अंशी बरोबर आहे. जर असे झाले, तर जवळजवळ अर्धे हिंदू एका झटक्यात नष्ट होतील. शेवटी आपल्याकडे काय आहे ? आपण आपली लोकसंख्याही वाढवत नाही, तसेच आपण स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नाही. या संदर्भात मुसलमान हिंदूंपेक्षा पुढे आहेत.’ राजा भैय्या महाकुंभामध्ये ‘दिव्य प्रेम सेवा मिशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी हिंदू समाजाला ‘स्वसंरक्षण, त्यासाठी सरकारमान्य शस्त्रे बाळगणे आणि सामाजिक सुधारणा’, यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

राजा भैय्या म्हणाले की,

धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी शस्त्र बाळगणे ही आपली परंपरा !

संस्कृतींचे रक्षण केवळ धर्मग्रंथांनी करता येत नाही, तर शस्त्रे असणेही आवश्यक आहे. नालंदा विद्यापीठ एका मुसलमान आक्रमणकर्त्याने उद्ध्वस्त केले होते, जिथे अनेक महिने ग्रंथ जळत राहिली. भगवान श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या व्यक्तीमत्त्वांचा आदर्श घेतला पाहिजे. धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगणे, ही आपली परंपरा आहे.

हिंदूंना स्वरक्षणासाठी संघटित व्हावे लागेल !

सध्या हिंदूंची लोकसंख्या वाढत नाही आणि शस्त्रास्त्रांचा साठाही होत नाही. मूर्ती विसर्जनांच्या वेळी आक्रमणे होत आहेत. आतंकवादी कारवायाही केल्या जात आहेत. यांमुळे हिंदु समाजाला स्वतःला संघटित करावे लागेल आणि स्वसंरक्षणासाठी उपाययोजना कराव्या लागतील. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून  लोकांना ‘एक संघटित समाज स्वतःची ओळख आणि अस्तित्व कसे जपू शकतो’, याची प्रेरणा दिली.

मुसलमानांकडून शिका !

मुसलमानांमध्ये त्यांच्या धर्माप्रती असलेल्या ऐक्य आणि समर्पण यांपासून हिंदूंनी शिकले पाहिजे. आपल्यालाही आपल्या धर्माप्रती अशीच तत्परता आणि समर्पण दाखवण्याची आवश्यकता आहे.

सैन्य आणि सशस्त्र दल आवश्यक !

देशाच्या सुरक्षेचा आधार भारतीय सैन्य आणि सशस्त्र दले आहेत. इस्रायलसारख्या छोट्या देशाने सशस्त्र बळामुळे स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !