Disha Salian Case : दिशा सालियन संशयास्पद मृत्यूप्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी सत्ताधारी आक्रमक !

महाविकास आघाडीतील प्रभावशाली मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आमदार अमित साटम यांचा आरोप  

दिशा सालियन (डावीकडे) आमदार अमित साटम (उजवीकडे)

मुंबई, २० मार्च (वार्ता.) – दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. या प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन न्यायालयात गेले आहेत. महाविकास आघाडीतील एका प्रभावशाली मंत्र्याचा यात सहभाग आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी २० मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत केली. सभागृहात भाजप आणि शिवसेना यांच्या आमदारांनीही अध्यक्षांच्या जागेच्या समोर येऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली. या वेळी सभागृहात झालेल्या गदारोळामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह १० मिनिटांसाठी रहित केले.

सभागृह पुन्हा चालू झाल्यावर सभापती राहुल नार्वेकर यांनी लक्षवेधी घेण्याची सूचना केली; मात्र सत्ताधारी पक्षातील आमदारांनी दिशा सालियन मृत्यूच्या चौकशीचे सूत्र लावून धरले. या वेळी भाजपचे आमदार अमित साटम म्हणाले, ‘‘दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात डिसेंबर २०२२ मध्ये विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पावणेपाच वर्षे झाली, तरी या पथकाचा अहवाल पुढे आलेला नाही. दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर मुंबईच्या तत्कालीन महापौरांनी दिशा सालियन हिच्या कुटुंबियांवर दबाव आणून त्यांना माध्यमांपुढे जाण्यापासून रोखले. दिशा सालियन हिच्या मृत्यूला महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. दिशा हिच्या वडिलांनी तिचे ४ मित्र, मंत्री आणि मुंबईचे तत्कालीन महापौर यांची नावे घेतली होती. या सर्वांची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करावी.’’

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ‘सर्वोच्च न्यायालयातील एका निकालानुसार अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणात चौकशीसाठी आरोपींना अटक करायला हवी’, अशी मागणी केली.

न्यायालयात योग्य भूमिका ठेवू ! – योगेश कदम, गृह राज्यमंत्री (शहर)

दिशा सालियन हिचे वडील न्यायालयात गेले असून न्यायालयाने या प्रकरणात सरकारला पक्ष केले आहे. या प्रकरणात कुठलाही राजकीय पक्ष असला, तरी कायदा सर्वांसाठी सारखा आहे. या प्रकरणी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात सहकारलाही पक्षकार करण्यात आले आहे. न्यायालयात आम्ही योग्य ती भूमिका ठेवू.