Graham Staines Case : ग्रॅहम स्टेन्स आणि त्याची २ मुले यांच्या हत्या प्रकरणातील दोषी दारा सिंह याने केली सुटकेची मागणी !

६ आठवड्यांत निर्णय घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ओडिशा सरकारला निर्देश !

उजवीकडे दारा सिंह

नवी देहली – वर्ष १९९९ मध्ये ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्याची दोन अल्पवयीन मुले यांची कथित हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या दारा सिंह याने त्याच्या सुटकेची मागणी केली आहे. ‘मी २५ वर्षांहून अधिक काळ कारागृहात घालवला आहे, या कारणास्तव माझी जन्मठेपेची शिक्षा माफ करण्यात यावी’, अशी विनंती करणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओडिशा सरकारला दारा सिंह याच्या माफी याचिकेच्या प्रकरणी ६ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्यास सांगितले आहे.

१. २३ जानेवारी १९९९ या दिवशी ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे ऑस्ट्रेलियन ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्याचे दोन अल्पवयीन मुलगे फिलिप आणि टिमोथी यांची हत्या करण्यात आली होती.

२. या प्रकरणात रवींद्र पाल उपाख्य दारा सिंह दोषी आढळला. त्याला कनिष्ठ  न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. नंतर वर्ष २००५ मध्ये ओडिशा उच्च न्यायालयाने ती शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली आणि वर्ष २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले.

३. दोषी दारा सिंह याने याचिकेत म्हटले आहे की, त्याने २५ वर्षांहून अधिक काळ कोणत्याही पॅरोलखेरीज कारागृहात घालवला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मारेकरी पेरारीवलन यालाही सर्वोच्च न्यायालयाने त्याच आधारावर सोडले होते. दारा सिंह याने असेही म्हटले आहे की, जेव्हा त्याने हत्या केली, तेव्हा तो तरुण होता. त्याला गुन्ह्याचा पश्‍चात्ताप होतो. आता त्याला चांगले जीवन जगण्याची संधी द्यावी.

४. ९ जुलै २०२४ या दिवशी दारा सिंह याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ओडिशा सरकारला नोटीस बजावली होती. आता न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि के.व्ही. विश्‍वनाथन् यांच्या खंडपिठाने म्हटले आहे की, राज्य सरकारने त्याच्या अर्जावर ६ आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा अन् त्याविषयी न्यायालयाला माहिती द्यावी.