‘रंगकलेतून शिवस्वराज्य रेखाटूया’ अशी संकल्पना घेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन !

लालबाग – मुंबईतील सर्वाधिक भव्य सोहळा अशी प्रसिद्धी मिळवलेले राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ भारत माता चौक येथे पार पडला. त्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘रंगकलेतून शिवस्वराज्य रेखाटूया’ या विषयावर ‘चित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्यात ‘चित्रकलेच्या माध्यमातून स्वराज्याचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांनी रेखाटावा’, असे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई शहर आणि उपनगर येथून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धकांना शिवयजयंतीला रोख रुपये रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सायंकाळी ७ वाजता महाराजांची महाआरती झाली. तसेच शिवशंभो मर्दानी आखाडा वस्ताद श्री. सुधीर गणपत कांबळे यांच्याकडून ५० लहानमोठ्या मावळ्यांसमवेत मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लाठी-काठी, भालाफेक, खंजीर, कट्यार, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या सोहळ्यास विविध स्तरांतून अनेक मान्यवर, चित्रपटसृृष्टीतील कलाकार, राजकीय नेते उपस्थित होते. अशी माहिती राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक / सचिव श्री. रोहित पिसाळ यांनी दिली.