‘हा तुमच्या बापाचा कार्यक्रम नाही, शांत बसा अन्यथा चालते व्हा !’ – काँग्रेसचे आमदार प्रदीप ईश्‍वर

कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसचे आमदार प्रदीप ईश्‍वर यांचा भर कार्यक्रमाच्या व्यासपिठावरून भाजपच्या कार्यकर्त्यांना दम

काँग्रेसचे आमदार प्रदीप ईश्‍वर

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘ऐक हा सिद्धरामय्या यांचा कार्यक्रम आहे, तुमच्या बापाचा नाही, म्हणून गप्प बसा, अन्यथा चालते व्हा’, असा दम काँग्रेसचे आमदार प्रदीप ईश्‍वर यांनी एका कार्यक्रमाला उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून दिला. येथील रवींद्र कला क्षेत्रात आयोजित ‘कैवार तातय्या योगीनारायण यतींद्र’ यांच्या २९९ व्या जयंती कार्यक्रमात हा प्रकार घडला. या वेळी व्यासपिठावर भाजपचे खासदार पी.सी. मोहन हेसुद्धा उपस्थित होते. दोघा नेत्यांमध्ये यावरून वाद झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

१. बेंगळुरू येथे या सरकारी कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदीप ईश्‍वर यांच्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम रणांगणासारखा बनला.

२. व्यासपिठावर बसलेले भाजपचे खासदार पी.सी. मोहन यांनी हस्तक्षेप केला आणि थेट विचारले की, ‘प्रदीप ईश्‍वरजी, जर हा सिद्धरामय्या यांचा कार्यक्रम असेल, तर मी भाजपचा खासदार म्हणून येथे रहावे कि नाही ? उत्तर द्या !’

३. या वक्तव्यांमुळे कार्यक्रमात मोठा तणाव निर्माण झाला. उपस्थित नागरिक आणि आयोजक यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली.

४. असे असले, तरी प्रदीप ईश्‍वर शांत बसले नाहीत. त्यांनी भाजपवर टीका करत सांगितले की, ‘जर तुम्ही तुमच्या पक्षाचे कौतुक करू शकता, तर आम्ही आमच्या पक्षाचे का करू नये ?’

५. भाजप खासदार पी.सी. मोहन यांनी भाजपच्या योगदानाचे कौतुक केल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमाचा पक्षाच्या प्रचारासाठी उपयोग होऊ नये, असे सूत्र उपस्थित करत प्रदीप ईश्‍वर कार्यक्रमातून निघून गेले.

संपादकीय भूमिका

  • भारतातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी अशा प्रकारे संवाद साधणारे आमदार सामान्य जनतेशी कसा व्यवहार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
  • सत्तेत आल्यावर काँग्रेसवाल्यांना किती माज येतो, हे यातून लक्षात येते !