गोव्यातील कथित साहित्यिक दत्ता नायक यांनी मंदिरांना लुटारू म्हटल्याचे प्रकरण
‘देवाक एक पैसो दिना. धर्माक जाल्यार भरपूर पैसो लुट्टा मरे देवळां बी. एक पैसो दिना. कितलो पैसो उल्लो म्हजो? हे मठ, पर्तगाळ मठ आनी किदें देवळां बी म्हाका लुट्टले आशिल्ले. एक पैसो दिना. मानना न्ही हांव देवाक’, ही दत्ता नायक यांनी उच्चारलेली त्या व्हिडिओतील वाक्ये. (अर्थ : देवाला एक पैसाही देत नाही. देवळे पण धर्मासाठी भरपूर पैसे लुटतात. एकही पैसा देत नाही. माझे किती पैसे राहिले ? हे मठ, पर्तगाळ मठ, देवळे पण, यांनी पण मला लुटले असते. एकही पैसा देत नाही. मी देवाला मानत नाही ना !) ‘देव वेगळा आणि देवस्थान वेगळे. लोक देवाला श्रद्धेने पैसे देतात आणि देवळे, मठ लुटतात’, असे मोहनदास लोलयेकर म्हणतात.
लूट, लुटालूट, म्हणजे एखाद्याच्या अनुमतीविना पैसे, मालमत्ता बळजोरीने काढून घेणे. दान दिलेल्या पैशांचा, भूमीचा अपहार, गैरवापर किंवा दिलेल्या हेतूखेरीज अन्य गोष्टींसाठी वापर होणे, याला ‘फसवणूक’ म्हणतात. लूट, लुटालूट नाही. स्वखुशीने दिलेल्या दानाचा गैरवापर झाला, तर त्याला ‘लुटणे’ म्हणता येत नाही.
१. ख्रिस्ती मिशनरी आणि साम्यवादी विचारवंत यांनी हिंदु धर्माविषयी रुजवलेल्या बीजाचा दुष्परिणाम
दत्ता नायक आणि लोलयेकर यांनी ‘देवस्थान समिती, मठ समिती लुटालूट करते’, असे म्हटले नाही. ‘देवळे, मठ लुटालूट करतात’, असे म्हटले आहे. हे अनवधानाने नाही. गेल्या ५-६ पिढ्या कळत नकळत रुजवलेल्या नकारात्मक विचारांचे ते प्रतिबिंब आहे. जगभर जिथे जिथे संस्कृती संपल्या, तिथे तिथे हेच पहावयास मिळते. अगदी नकळत बिंबवलेल्या शब्दांचा परिणाम पुष्कळ मोठा होतो. सगळे हिंदी भाषिक चित्रपट काढून पहा; त्यात वाईट घडते ते सणाच्या दिवशीच का असते ? देवळात लपूनछपून प्रेम (?) करणारे दाखवतात; कधीही मशिदीत, चर्चमध्ये का नाही ? ‘हवस का पुजारी’ असतो; पाद्री, मौलवी का नाही ? प्रश्न हिंदु-मुसलमान, हिंदु-ख्रिस्ती असा मुळी नाहीच. आपल्या संस्कृतीची श्रद्धास्थाने पद्धतशीरपणे नकारात्मक, घृणास्पद ठरवण्यात आली. याचा परिणाम इतका होतो की, ज्या सणांनी पर्यावरण जपले, ते सण पर्यावरणविरोधी ठरवले जातात. ख्रिस्ती मिशनरी आणि साम्यवादी विचारवंत यांनी शेकडो वर्षे रुजवलेले नकारात्मक विचार अशा पद्धतीने फलद्रूप होत आहेत. आपण आपल्याच संस्कृतीच्या प्रतिकांना हीन, वाईट ठरवत आहोत.
२. ‘लूट’सारखे शब्द जाणीवपूर्वक वापरले जाणे
याचीच दुसरी बाजू पाहू. यातील एकही विचारवंत, इतिहासतज्ञ ‘चर्च संस्थेने देवळे पाडून चर्च बांधली’, असे म्हणत नाही. ते पोर्तुगिजांच्या नावे खपवले जाते. पोर्तुगिजांनी देवळे पाडून चर्च उभी केली, असे म्हटले जाते. भारतभर देवळे पाडून मशिदी बांधल्या ते परकीय इस्लामी शासकांवर खपवले जाते, इस्लामवर नाही.
‘लुटालूट’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो. लूट करणारा लुटारू असतो. देवळे, मठ हेही लुटारू ठरतात. नास्तिकवाद, समतावाद, पर्यावरणप्रेम, प्राणीप्रेम असलेले सगळे विचारवंत, ‘ॲक्टिव्हिस्ट’ (कार्यकर्ते) संस्कृतीच्या प्रतिकांना, मानबिंदूंना लक्ष्य करतात. म्हणूनच देवस्थान आणि मठ समिती यांच्याऐवजी ‘देऊळ’, ‘मठ’ आणि भ्रष्टाचार, फसवणूक यांऐवजी ‘लूट’ असे शब्द जाणीवपूर्वक वापरले जातात.
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (८.१.२०२५)