Asaramji Bapu Gets Bail : ११ वर्षे ४ महिन्यांनंतर पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना जामीन !

कारागृहातून बाहेर पडल्यावर जोधपूर येथील आश्रमात निवास

पूज्यपाद संतश्री आसाराम बापू

जोधपूर (राजस्थान) – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने कथित बलात्काराच्या प्रकरणात अंतरिम जामीन संमत झाल्यानंतर त्यांची १४ जानेवारीला रात्री उशिरा कारागृहातून सुटका करण्यात आली. यानंतर ते जोधपूरच्याच पाल गागातील त्यांच्या आश्रमात निवासाला गेले. येथे सेवकांनी फटाके फोडून पू. बापू यांचे स्वागत केले. ३१ मार्चपर्यंत त्यांना हा जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागण्याची शक्यता आहे.

पू. बापू यांच्यावर गुजरातमधील गांधीनगर आणि राजस्थानमधील जोधपूर येथे  कथित बलात्कारांचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गुजरातशी संबंधित खटल्यात त्यांना ७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर जोधपूर प्रकरणातही १४ जानेवारीला उच्च न्यायालयाने संमत केला. जवळपास ११ वर्षे ४ मास आणि १२ दिवसांनंतर ते कारागृहातून बाहेर आले. यापूर्वी त्यांना औषधोपचारासाठी बाहेर जाऊ देण्यास आले होते.

जामिनासाठी ३ अटी

न्यायालयांनी जामीन देतांना पू. बापू यांनी ३ अटी घातल्या आहेत. यात पू. बापू त्यांच्या अनुयायांना भेटू शकत नाहीत. साधकांना गटामध्ये भेटता येणार नाही. ते प्रसारमाध्यमांशी बोलू शकणार नाहीत किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवचनही देऊ शकणार नाहीत. त्यांच्यासमवेत नेहमी ३ सुरक्षारक्षक रहाणार असून त्यांचा खर्च पू. बापू यांनाच करावा लागणार आहे.

देशातील कोणत्याही आश्रमात रहाण्याची पू. बापू यांना अनुमती असणार आहे.  रुग्णालयात किंवा आश्रमात उपचार घेण्यासाठी अनुमती दिली जाईल.