ठाणे येथील (कै.) यशवंत शहाणे यांच्या निधनानंतरचा आज १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
१.१.२०२५ या दिवशी ठाणे येथील यशवंत सदाशिव शहाणे (वय ८० वर्षे) यांचे निधन झाले. १३.१.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवेशिष्ट्ये, त्यांच्यात झालेले पालट, तसेच त्यांच्या आजारपणात आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. श्रीमती जया यशवंत शहाणे (कै. यशवंत शहाणे यांची पत्नी, वय ७८ वर्षे), ठाणे
१ अ. व्यवस्थितपणा : ‘माझे यजमान यशवंत शहाणे हे सर्व वस्तू अत्यंत व्यवस्थित ठेवत. पैशांच्या व्यवहाराविषयी सर्व नोंदी एखाद्या लेखा परीक्षकालाही लाजवेल, अशा प्रकारे त्यांच्या वह्यांमध्ये त्यांनी अत्यंत विस्तृतपणे आणि व्यवस्थित मांडून ठेवल्या होत्या.

१ आ. ते अत्यंत प्रामाणिक होते. ते सर्व प्रकारचे कर काटेकोरपणे भरत.
१ इ. पत्नीला साधनेत साहाय्य करणे : त्यांच्यामुळे मी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागले. त्यांनी मला सेवेला जाण्यासाठी वेळोवेळी साहाय्य केल्याने मी अनेक वर्षे सेवा करू शकले.’
२. सौ. रूपाली अभय वर्तक (कै. यशवंत शहाणे यांची मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२ अ. पत्नीला तिच्या स्वभावदोषांसह स्वीकारणे आणि स्वतःत पालट करणे : ‘माझ्या बाबांना (यशवंत शहाणे यांना) ‘माझ्या आईने (जया शहाणे यांनी) स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत’, अशी अपेक्षा असायची. गेल्या ३ – ४ वर्षांत त्यांनी आईला तिच्या स्वभावदोषांसह पूर्णपणे स्वीकारले आणि स्वतःमध्ये पालट करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला.

२ आ. परेच्छेने वागण्याचा प्रयत्न करणे : बाबा म्हणत, ‘‘आता ‘तुम्ही म्हणाल तसे !’, या तत्त्वाप्रमाणे मी वागणार आहे’’ आणि खरोखरच अनेक प्रसंगांत ते तसा प्रयत्न करत असल्याचे माझ्या लक्षात आले.
२ इ. येणार्या अनुभूतींमुळे कृतज्ञताभावात वाढ होणे : दिवसभरात अनेक कृतींनंतर ते नियमित कृतज्ञता व्यक्त करत असत. ‘प्रकृतीत बिघाड झाल्यावर ती अकस्मात् ठीक होणे, घरातील काही कामांत अडचणी आल्यावर कुठूनतरी साहाय्य मिळणे’, अशा अनेक अनुभूती त्यांना वारंवार येत असत.
बाबांना अनेक दिवस प्रतिदिन रात्री कृतज्ञता व्यक्त करत असतांना ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या झोपाळ्यावर बसलेल्या छायाचित्रातील त्यांचे चरण, श्रीकृष्णाच्या चित्रातील डोळे आणि सुदर्शनचक्र, तसेच श्री दत्तगुरूंच्या चित्रातील शस्त्र’ यांच्या हालचाली स्पष्टपणे जाणवायच्या. या अनुभूतींमुळे त्यांच्यातील कृतज्ञताभावात वाढ झाली होती.
२ ई. अनेक दिवस न वाढणारी तुळस प्रार्थना केल्यावर साडेचार फूट उंच वाढणे : घरातील देवघराजवळील खिडकीतील तुळस अनेक दिवस वाढत नव्हती. त्यानंतर बाबांनी प्रतिदिन तुळशीला प्रार्थना करायला आरंभ केल्यावर ती वाढली आणि साडेचार फूट उंच झाली.
२ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची अकस्मात् भेट झाल्यावर भावजागृती होणे : मागील वर्षी एका प्रवासाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ पनवेल येथील आमच्या घराजवळून जाणार होत्या. त्या वेळी माझे आई-बाबा त्यांच्या दर्शनासाठी घराखाली येऊन थांबले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांना नमस्कार करून प्रसाद दिला. त्या वेळी बाबांची भावजागृती झाली. ही देवाने त्यांना दिलेली मोठी अनुभूती होती. ही भेट पूर्वनियोजित नव्हती, तर अकस्मात् झाली होती.
२ ऊ. रुग्णाईत असतांना संतांची अनुभवलेली कृपा !
१. बाबांना रुग्णालयात भरती केल्यावर सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६२ वर्षे) आणि सनातनचे १९ वे (समष्टी) संत पू. रमेश गडकरी (वय ६७ वर्षे) यांनी त्यांना वेळोवेळी विविध नामजप करण्यास सांगितले. ‘त्यांनी सांगितलेले नामजप केल्यामुळे बाबांना शारीरिक त्रास आणि प्रारब्ध सहन करणे सुसह्य झाले’, असे मला जाणवले.
२. बाबांचा रक्तदाब अनेक वेळा न्यून होत असे. तेव्हा त्यांनी संतांनी सांगितलेला नामजप केला की, तो पूर्ववत् होत असे.
३. एकदा रात्री ११.३० वाजता अकस्मात् त्यांचा त्रास वाढला. त्या वेळी पू. गडकरीकाका यांनी सांगितलेला नामजप मी त्यांचे अनाहतचक्र आणि सहस्रारचक्र यांवर माझ्या हातांसह त्यांचे हात ठेवून मोठ्याने केला. माझ्या समवेत त्यांनीही नामजप केला. त्या वेळी केवळ ५ मिनिटांत त्यांचा त्रास न्यून झाला.
४. आजारपणातील दीड मासाच्या कालावधीत बाबांचा पुष्कळ नामजप झाला. या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे म्हणाले, ‘‘या नामजपाचा त्यांना पुढील गती चांगली मिळण्यासाठी लाभ होईल !’’
५. सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५१ वर्षे) आणि सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) संगीता जाधवकाकू (वय ५५ वर्षे) या दोघी बाबांना भेटायला रुग्णालयात आल्यामुळे बाबांना त्यांच्या चैतन्याचा लाभ झाला.
२ ए. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. बाबांच्या निधनानंतर पू. रमेश गडकरी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या गळ्यात तुळशीचा हार घातला. ‘संतांनी शेवटच्या क्षणी गळ्यात तुळशीचा हार घालणे’, हे भाग्यही किती अत्यल्प जणांना मिळत असेल ? ते माझ्या बाबांना मिळाले !
२. बाबांचे पार्थिव घरात आणल्यावर कुठलाच दाब जाणवत नव्हता.
३. अंत्यविधीची सिद्धता करतांनाही मला उत्साह जाणवत होता.
४. माझे नातेवाईक आणि मैत्रीण यांनी गीतेचे ४ अध्याय, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम इत्यादी मोठ्याने म्हटले. त्यामुळे अंत्यविधीपूर्वी घरात चांगले वातावरण होते.
‘वरील सर्व केवळ गुरुकृपेनेच शक्य झाले’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ६.१.२०२५)