नेवासा, अहिल्यानगर येथील साधिका सौ. सीमंतीनी बोर्डे (संगीत अलंकार) यांना पू. किरण फाटक आणि पू. केशव गिंडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् संगीत साधनेविषयी शिकायला मिळालेली सूत्रे

‘वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येक अडीच मासांनी संगीत सेवेसाठी जात असे. वर्ष २०१९ मध्ये कोरोना महामारीच्या काळात माझे रामनाथी आश्रमात जाऊन सेवा करणे बंद झाले. नंतर काही वर्षे वेगवेगळ्या अडचणींमुळे मी रामनाथी आश्रमात जाऊ शकले नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला १७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ या कालावधीत आश्रमात जाण्याची आणि संगीत विषयाच्या संदर्भात सेवा करण्याची संधी मिळाली. त्या काळात ‘संगीतसाधना, संगीत क्षेत्रातील संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि माझ्याकडून साधनेसाठी झालेले प्रयत्न’, यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

गायनसाधना

१. संगीताविषयीचा अहं न्यून होण्यासाठी साधिकेने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना करणे, परिणामी साधिकेला शिकण्याच्या स्थितीत रहाता येणे

सौ. सीमंतीनी बोर्डे,

पूर्वी माझ्या मनात ‘मी चांगली गाते, मला पुष्कळ ज्ञान आहे’, असे तीव्र अहंचे विचार येत आणि माझे वागणे अन् बोलणे यांतून तो अहं प्रकट होत असे. अहं न्यून होण्यासाठी मी सेवा चालू करण्यापूर्वी गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना करत असे, ‘हे गुरुदेवा, ‘मला येते, मला कळते, मला ज्ञान आहे’, हा माझा अहंकार तुम्हीच नष्ट करा. या सेवेच्या माध्यमातून आपण मला काय शिकवत आहात ? ‘मी सेवा किंवा संगीताचा अभ्यास करण्यात कुठे न्यून पडते ?’, हे तुम्हीच मला दाखवून द्या; कारण माझ्या अल्प बुद्धीच्या ते लक्षात येत नाही.’ अशी प्रार्थना केल्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने रामनाथी आश्रमात आल्यावर या १७ दिवसांच्या कालावधीमध्ये माझी शिकण्याची स्थिती टिकून राहिली.

पू. किरण फाटक

२. संगीत क्षेत्रातील संत आणि थोर शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या गायनाच्या ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) पाहून शिकायला मिळालेली सूत्रे

२ अ. ‘कोणते राग साधकाच्या कोणत्या चक्रावर परिणाम करतात ?’, याविषयी पू. किरण फाटक यांच्या गायनातून समजणे : पू. किरण फाटक यांनी विविध रागांचा आध्यात्मिकदृष्ट्या सखोल अभ्यास केला आहे. ‘कोणते राग साधकाच्या कोणत्या चक्रावर परिणाम करतात ? आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय व्हावेत; म्हणून ते राग कसे गायचे ?’, हे मला पू. काकांच्या प्रयोगातून शिकता आले, उदा. आज्ञाचक्राचा प्रयोग असल्यास त्या चक्राशी संबंधित स्वर ‘ध (धैवत)’ हा आहे. धैवत हा स्वरप्रधान राग गातांना ‘ध’ या स्वरावर अधिक आघात करून आज्ञाचक्राच्या संदर्भातील व्याधीवर उपाय करता येतात.

२ आ. गायन अहंकारविरहित असावे ! : पू. फाटककाका स्वतःचे अस्तित्व विसरून गायनाशी एकरूप होऊन गातात. तेव्हा ‘संतांचे गायन अहंकारविरहित असते’, हे माझ्या लक्षात आले आणि ‘माझे गायन अहंकारविरहित असायला हवे’, हे मला पू. काकांच्या गायनातून शिकायला मिळाले.

२ इ. रागांकडे बघण्याची नवीन दृष्टी प्राप्त होणे : आध्यात्मिक अर्थ असलेल्या बंदिशी (टीप १) गातांना पू. किरण फाटककाका बंदिशींचे अर्थ अत्यंत सुंदरतेने समजावून सांगत होते. यातून ‘बंदिशी कशा असायला हव्यात ? त्यातून आपल्या आत्म्याचा पारलौकिक दिशेने प्रवास कसा घडू शकतो ?’, हे मला समजले. यातून मला रागांकडे बघण्याची नवीन दृष्टीच प्राप्त झाली.

टीप १ – शास्त्रीय गायनातील रागांचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत, यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात.

२ ई. ‘बंदीश कशी असायला हवी ? आणि ‘रागाचा डौल कसा सांभाळायचा ?’, हे समजणे : काही वर्षांपासून शास्त्रीय संगीतातील रागांमध्ये माझ्याकडूनही काही बंदिशी रचल्या गेल्या आहेत. ‘रागांमध्ये स्वतःकडून बंदीश घडणे’, हीच फार मोठी गोष्ट आहे’, असे मला वाटत असे; परंतु पू. किरण फाटक यांच्या बंदिशीतून ‘भगवंताचे अनुसंधान साधण्यासाठी आध्यात्मिक अर्थाची आणि आध्यात्मिक आशय व्यक्त करणारी बंदीश असायला हवी’, हे मला समजले. त्याचप्रमाणे भावपूर्ण गायन करतांना ‘त्या रागाचा डौल (टीप २) कसा सांभाळायचा ?’, हेही मला शिकायला मिळाले.

टीप २ – रागाची विशिष्ट स्वरसंगत घेतांना रागनियम कुठेही न मोडता वादी-संवादी स्वरांना महत्त्व देत आलापी आणि स्वरविस्तार करत रागाची प्रस्तुती करणे.

पू. पंडित डॉ. केशव गिंडे

३. संगीत क्षेत्रातील संत आणि ज्येष्ठ बासरीवादक पू. केशव गिंडेकाका यांच्या बासरीवादन प्रयोगांच्या ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) पहातांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये

अ. ‘पू. केशव गिंडेकाकांच्या मुखमंडलावरील अप्रतिम तेज पहातच रहावे’, असे मला वाटले.

आ. पू. काकांच्या बासरीवादनामध्ये पुष्कळ माधुर्य आणि गोडवा जाणवला.

(क्रमश: पुढील गुरुवारी)

– सौ. सीमंतीनी बोर्डे, संगीत अलंकार, नेवासा, अहिल्यानगर (नगर). (२५.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक