प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज – वैष्णव संप्रदायाशी निगडित श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच निर्मोही अनी आखाडा आणि श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या तिन्ही अनी आखाड्यांच्या धर्मध्वजांचे आरोहण २८ जानेवारीला सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत त्यांच्या आखाड्यांमध्ये झाले. या वेळी या तिन्ही आखाड्यांचे महामंडलेश्वर, श्रीमहंत, महंत यांच्यासह अनेक साधू-संत उपस्थित होते. या तिन्ही आखाड्याचे आराध्यदैवत श्री हनुमान आहे.
आरंभी श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे ध्वजारोहण झाले. या वेळी वेदमंत्रोच्चारात श्री हनुमंताची स्थापन करून त्याचे पूजन आणि आवाहन करण्यात आले. त्यापाठोपाठ श्री पंच निर्वाणी आणि नंतर श्री पंच निर्मोही आखाड्यातही अशा प्रकारे विधिवत्पणे ध्वजारोहण सोहळा पार पडला. य तिन्ही आखाड्यांच्या प्रांगणात भव्य ध्वजस्तंभ उभारून त्यावर आपापल्या आखाड्यांचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी दिगंबर आखाड्याचे श्रीमहंत रामकृष्ण शास्त्री महाराज, महामंत्री श्री वैष्णवदासजी महाराज, निर्मोही आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्रदासजी महाराज, निर्वाणी आखाड्याचे श्रीमहंत यांच्यासह मेळा अधिकारी, पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते. आखाड्यांच्या दृष्टीने ध्वजरोहणानंतर महाकुंभपर्वास खर्या अर्थाने आरंभ होतो.