कोल्हापूर-सांगलीतील नागरिक अन् शेतकरी यांच्या जीविताला-मालमत्तेला हानी न पोचण्यासाठी सरकार पावले उचलेल ! – मुख्यमंत्री

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटकातील अलमट्टी धरण महाराष्ट्राच्या क्षेत्रापासून २३५ किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाच्या उंचीमुळे होणार्‍या परिणामाविषयी अधिक ठोस निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागणार आहे. अलमट्टी धरणाच्या साठ्याचा महाराष्ट्रावर होणार्‍या परिणामाच्या फेरअभ्यासासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी रुरकी’ येथील शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. एन्.आय.एच्. शास्त्रज्ञांचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्या संदर्भात लवाद, न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाणे, असे राज्य सरकारचे सर्व पर्याय खुले आहेत. ते राज्य सरकार अवलंबेल. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नागरिक आणि शेतकरी यांच्या जीविताला-मालमत्तेला हानी पोचणार नाही, यासाठी सर्व योग्य ती पावले सरकार उचलेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

ते म्हणाले की, राज्य सरकारने सातत्याने येणारे पुराचे पाणी दुष्काळी भागात वळण्यासंदर्भात १ अहवाल आधीच सिद्ध केला आहे. तो अहवाल वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेला सादर केला आहे. त्यांनी त्याला मान्यता दिली, तसेच ४ सहस्र कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी त्यांच्यासमवेत बैठक घेऊन पुढील अभ्यास अहवाल सिद्ध करण्याची कार्यवाही प्रगती पथकावर आहे. अभ्यासासाठी लागणारा सर्व डेटा त्यांना संबंधित विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. २१ जून २०२४ या दिवशी झालेल्या एका बैठकीत एन्.आय.एच्. रुरकी येथील शास्त्रज्ञांनी अभ्यास अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून सध्यस्थितीत डेटा व्हॅलिडेशन प्रगतीपथावर असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आश्वासित केले आहे.