हिंदु मंदिरांची दयनीय स्थिती आणि मंदिरांचे सरकारीकरण !

श्री. अनिल धीर हे ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (इन्टॅक) या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख सदस्य आहेत. ते मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी कार्य करतात. दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी श्री. धीर यांनी ‘मंदिराचे रक्षण आणि संवर्धन, तसेच मंदिराचे सरकारीकरण’, यांविषयी मांडलेले विचार वाचकांसाठी देत आहोत.

(भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/863524.html

श्री. अनिल धीर यांच्याशी संवाद साधतांना श्री. विक्रम डोंगरे

६. हिंदु मंदिरांचे सरकारीकरण करणार्‍या सरकारचे अन्य धर्मीय प्रार्थनास्थळांकडे दुर्लक्ष !

श्री. अनिल धीर

मंदिराचे सरकारीकरण हा सामाजिक प्रश्न आहे. आमचे कार्य संवर्धन आणि संरक्षण करणे आहे. आम्ही मंदिराच्या सरकारीकरणाच्या विरोधात सक्रीयता, वकिली करणे आणि जागृती करणे ही कार्य करतो. ‘केवळ हिंदु मंदिरांचेच सरकारीकरण होते; पण अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत नाही’, याविषयी हिंदूंमध्ये जागृती नाही. त्यामुळे ते अनभिज्ञ आहेत. आपल्याला ठाऊक असेल की, जेव्हा व्यवस्थापन समितीत आपापसांत वाद असतो, तेव्हा सरकार एखादा मठ किंवा मंदिर कह्यात घेते. त्यानंतर सरकारकडून तेथे प्रशासक नेमला जातो. याच न्यायाने पाहिले, तर चर्च, मशिदी आणि गुरुद्वारा यांच्या व्यवस्थापनात अपप्रकार होत नाहीत का ? तेथे तर मारहाण आणि गोळीबार यांच्यासारख्या घटना होतात; पण तेथे सरकार काहीही करत नाही. ज्या मंदिरांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि प्रचंड दान गोळा होते, ती मंदिरे सरकारने कह्यात घेतली. अनेक दुरवस्था असलेली मंदिरे आहेत आणि त्यांच्या व्यवस्थापनातही चुका आहेत; पण सरकार तेथे रस दाखवत नाही. जेथून लक्षावधी, कोट्यवधी रुपये मिळतात, त्याच मंदिरांवर सरकारचा डोळा असतो.

जैन संप्रदाय त्यांच्या मंदिरांच्या पैशाची व्यवस्था पहातो. जैन मंदिरांचा पैसा पूर्णतः नवीन मंदिरे बांधण्यासाठी किंवा जुन्या मंदिरांचा जिर्णाेद्धार करण्यासाठी वापरला जातो. ज्या हिंदु मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे किंवा जेथे सरकारचे प्रतिनिधी मंदिरे चालवतात, त्या मंदिरांचा पैसा, भूमी आणि संपत्ती यांचा वापर अनेकदा अन्य धर्मियांसाठीही झाल्याचे दिसून आले आहे. दुर्दैवाने अनेक वेळा या मंदिरांवर नेमण्यात आलेले सरकारी प्रशासकही अहिंदु असतात. एखाद्या मशिदीच्या समितीत एखाद्या हिंदूला घेतले आहे, अशी कल्पना तरी आपण करू शकतो का ? याविषयी लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. यासंदर्भात सर्वच दोष सरकारला देऊन चालणार नाही, त्यात काही दोष आपल्या लोकांचाही (हिंदूंचाही) आहे. त्यांनी मंदिरांच्या सेवाकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक आहे.

७. मंदिरांचे नियंत्रण भक्तांकडे देण्यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण करणे आवश्यक !

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात अनेक खटले चालू आहेत. त्या संदर्भात एखादा चांगला निवाडा आला आणि त्यात ‘मंदिरांचे सरकारीकरण धर्मनिरपेक्ष यंत्रणेच्या विरोधात आहे. मंदिराचे सरकारीकरण करायचे असल्यास केवळ एकाच धर्माचे नाही, तर सर्वच धर्मियांचे करा किंवा कुणाचेही करू नका’, असे न्यायालयाने सरकारला सांगितले, तर काही चांगले घडू शकते. मी पुरी येथील मंदिरांच्या पुरोहितांना सांगतो की, तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी या मंदिराला व्यवस्थित ठेवले आहे. कोणताही पुरातत्व विभाग, कोणतेही सरकार किंवा पुरातत्वशास्त्र त्या वेळी नव्हते. आम्ही शाळा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, महाविद्यालये येथे ‘वारसा शिबिर’आयोजित करतो. तेव्हा आम्हाला ‘या गोष्टीचा विद्यार्थ्यांना काय लाभ होणार आहे ?’, असे विचारण्यात येते. तेव्हा आम्ही सांगतो, ‘हिंदु मंदिरांचे स्थापत्य हे अमूल्य आहे.  मंदिरे उभारली जात असतांना सहस्रो लोक काम करत होते. त्यांचे विशेष व्यवस्थापन होते. एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी राजा बलपूर्वक बनवून घेत नव्हता, तर कारागिरांमध्ये श्रद्धा आणि भाव असल्यामुळेच हे शक्य झाले. या सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थापन कौशल्य आहे. आताही सर्व प्रकारचे लोक आहेत. अनेक हिंदु मंदिरे रुग्णालये आणि विद्यापिठे चालवतात. त्यामुळे भक्त हे मंदिरे चांगल्या प्रकारे चालवू शकतात. त्यामुळे मंदिरांचे व्यवस्थापन धार्मिक आणि देवाप्रती श्रद्धा असलेल्या व्यक्तींकडे सोपवावे. त्यासाठी लोकांचा दबाव हवा, जो सध्या नाही. आपणही मंदिरात जातो. चांगले वाटले, तर कौतुक करतो आणि वाईट वाटले, तर टीका करतो.’

८. नवीन मंदिरे बांधण्यापेक्षा पुरातन मंदिरांचा जीर्णाेद्धार करणे आवश्यक !

मी भारतभर प्रवास करतो. मी अनेक मोठे उपक्रम राबवले आहेत. माझ्या जीवनात मी आतापर्यंत साडेसहा सहस्र मंदिरांची कागदपत्रे जमवली आहेत. मी एकही मशीद, दर्गा, गुरुद्वारा किंवा चर्च यांना भग्नावस्थेत पाहिले नाही. काही राज्यांमध्ये, तर भग्न मंदिरे अधिक आणि जिवंत मंदिरे फार अल्प आहेत.

बंगालमध्ये प्रत्येक गावात ३ पुरातन मंदिरे भग्नावस्थेत मिळतील. ही ८ व्या ते १० व्या शतकातील अतिशय सुंदर मंदिरे आहेत. त्या काळातील मंदिरांचा सहजपणे जीर्णाेद्धार करता येऊ शकतो. माझ्या मते काही वर्षे आपल्याला नवीन मंदिरे बनवण्याची आवश्यकता नाही. १० वर्षे आपल्या पुरातन मंदिरांचाच जीर्णाेद्धार करा आणि त्यांचीच जपणूक करा. आपल्याला ठाऊक नाही की, तेथे किती कोट्यवधी लोकांनी पूजा केली असेल आणि किती मोठ्या प्रमाणात चैतन्य असेल. सध्या हिंदु समाज स्पर्धा करण्यात धन्यता मानतो. प्रत्येकाला संगमरवरी मंदिरे बनवायची आहेत आणि विद्युत् रोषणाई करून झगमगाट करायचा आहे.

९. मंदिरांचे पर्यटनस्थळ केल्याने आध्यात्मिकतेचा र्‍हास

मंदिरे ही स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा होती. उदाहरणार्थ पुरीच्या मंदिराबाहेर फुले विकली जात होती, फळे, प्रसाद, दिवे, तसेच मुलांची खेळणी विकली जात होती. तेथे साधू, तसेच भिकारीही बसलेले असायचे. तेथे अन्य प्राणी आणि कुत्रीही फिरत असत. त्या सर्वांची एक ‘व्हर्नाक्युरल इकॉलॉजी’ (प्रादेशिक परंपरा) होती. सध्या मंदिर व्यवस्थापनाने सर्व स्वच्छ केले आहे. मंदिराच्या बाहेर टाईल्स, बेंच आणि प्लास्टिकची झाडे लावली आहेत. मंदिरांच्या बाहेर मला भगवे वस्त्र घालून बसलेले साधू दिसत नाही. त्याऐवजी टी-शर्ट घातलेले आणि ‘लव्ह जगन्नाथ’ (जगन्नाथावर प्रेम), असे लिखाण केलेल्या टोपी घातलेले लोक दिसतात. हिंदु मंदिराच्या आत जेवढी आध्यात्मिकता आहे, तेवढीच बाहेरही आहे. पूर्वी आपण मंदिरात जात आहोत, हे अर्धा किलोमीटर आधीच कळत होते. आता मंदिरांना प्रेक्षणीय स्थळांमध्ये परावर्तित केले आहे. मंदिरांचे सरकारीकरण करतांना त्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले; पण त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचा विचार झाला नाही. यासंदर्भात शंकराचार्यांचे मत घेतले असते, तर त्यांनीही असे करण्यास नकार दिला असता.

हिंदु मंदिरे अद्वितीय आहेत. आपल्या मंदिरांची एक ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) आहे. भारतातील काही शहरांचे अर्थकारण हे केवळ मंदिरांवरच अवलंबून होते. पूर्वी पुरीचे सर्व अर्थकारण मंदिरातून चालत होते. सध्या मंदिराच्या बाहेरील ४ सहस्र दुकानदारांना उठवण्यात आले. ते कुठे गेले, याची मह्हिती कुणालाही नाही. हे केवळ हिंदु मंदिरांच्या संदर्भात घडले आहे. असे अन्य पंथियांच्या संदर्भात होऊ शकत नाही.

मंदिराच्या परिसरात स्वच्छता, तसेच यात्रेकरूंसाठी चांगल्या सुविधा असल्याच पाहिजे. याविषयी दुमत नाही; पण सर्वच नष्ट करणे योग्य नाही. रस्ते बांधण्यासाठी मठ तोडले. जेवढी पुरातन मंदिरे होती, तेवढेच पुरातन मठही होते. कालांतराने जुने मंदिर पाडून नवीन बांधण्यात येईल. अनेक लहान मंदिरांमध्ये असे झालेही आहे. मंदिरात ‘सिरॅमिक टाईल्स’ आणि संगमरवर लावले जातात. मंदिरातील आनंद आणि शांती यांचे मूळ स्रोतच काही प्रमाणात चुकीच्या नियोजनामुळे नष्ट केले जात आहेत. जुन्या मंदिरांचा जीर्णाेद्धार करा; कारण आता तशी मंदिरे बनवणे अशक्य आहे. गाववाड्यात जी मंदिरे तुटक्या अवस्थेत पडली आहेत, त्यांच्यातच सुधारणा करा. आजच्या काळात आपण तशी सुंदर मंदिरे बनवूच शकत नाही. बंगालमधील मोठे टेराटोका मंदिर आता बनू शकत नाही; कारण आता तसे कारागीर राहिले नाहीत. अनेक मंदिरांचा वाद चालू आहे. त्यातून त्यांना मुक्त करा. सरकारने भग्नावस्थेतील मंदिरांसाठी विशेष धोरण राबवावे.

१०. पुरातन मंदिरे आहे त्या स्थितीत पुढील पिढीला हस्तांतरित करणे, हे सर्वांचे कर्तव्य !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि राज्य पुरातत्व हे १०० वर्षांपूर्वी नव्हते. ज्या गावात पुरातन मंदिर आहे, तेथे नियमित पूजा होते, त्यावर गावकर्‍यांची श्रद्धा आहे आणि त्यांच्याच योगदानातून मंदिर चालते. मंदिराला भक्ती हवी. तेथे कोणता पुरातत्व विभाग पोचत नाही. गावकरीच त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने देखभाल करतात. लोकांच्या श्रद्धेवरच मंदिर उभे राहील आणि ते कधीही तुटणार नाही. भक्तांनी हे मंदिर जुने झाले आहे, असे समजून नवीन मंदिर बांधायला घेतले, तर ते गावकर्‍यांकडून वर्गणी काढून तेथे नवीन मार्बल, टाईल्स लावतील, रोषणाई करतील; पण त्याने चैतन्य मिळणार नाही. आध्यात्मिक शक्तीनेच मंदिरे राहू शकतात.

ओडिशाचेच उदाहरण पाहिले, तर ८ व्या ते १० व्या शतकांतील मंदिरे अद्यापही जिवंत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही पुरातत्व विभागाने लक्ष दिले नाही, तरी सरकारने कह्यात घेतलेल्या मंदिरांहून त्यांची स्थिती चांगली आहे. गावकर्‍यांसाठी मंदिर सर्वकाही असते. त्यामुळे श्रद्धेवरच ते उभे रहाते आणि ते नाशही पावत नाही. सरकारने मंदिरांना एक इमारतीच्या दृष्टीने पाहू नये. त्याच्याविषयी लोकांची श्रद्धा किती आहे ?, लोकांना त्याच्याविषयी किती महत्त्व आहे ? आणि त्याचा उघड इतिहास काय आहे ?, हे पाहिले पाहिजे. कोणार्कचे मंदिर  ७०० ते ८०० वर्षांपूर्वी तेव्हाच्या राजाने बनवले होते. ते यासाठी बनवले नव्हते की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण १०० रुपयांचे तिकीट घेईल. आपण या मंदिरांचे मालक नाही. अल्प काळासाठी संरक्षक आहोत. त्यामुळे आपले कर्तव्य आहे की, ज्या स्थितीत हे मंदिर आपल्याला मिळाले, ते त्याच स्थितीत किंवा त्याहून चांगले आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करावे. आपण केवळ मध्यस्थ आहोत. आपल्याला वाटले, ‘आपण मालक आहोत, वाटेल तेव्हा तोडून टाका, त्याला सौदर्यकरणाच्या नावाखाली त्याच्यात पालट करा, तर त्याचा आपल्याला अधिकार नाही.’ पुरातन मंदिरांविषयीच्या भावनांचा आपल्याला आदर करावा लागेल. तोडणे, ही फार लांबची गोष्ट आहे. माझ्या मते हिंदु मंदिर कोणत्याही राज्यात असो, ते आधीच इतके सुंदर आहे की, त्याचे तुम्ही त्याचे सौंदर्यीकरण करूच शकत नाही. ते कोणत्याही शैलीतील असो, ते इतके सुंदर आहे की, आपली पात्रता नाही की, त्याला आपण त्याहून सुंदर बनवू.’

– श्री. अनिल धीर, सदस्य, ‘इन्टॅक’ गव्हर्निग कौन्सिल, ओडिशा.