Jai Shri Ram Slogans In Masjid : मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’ची घोषणा देणे गुन्हा कसा असू शकतो ?

सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

नवी देहली – ‘मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देणे, हा गुन्हा कसा असू शकतो ?’, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कडाबा तालुक्यातील एका मशिदीमध्ये कीर्तन कुमार आणि सचिन कुमार या २ हिंदु तरुणांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यावर कर्नाटक उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने गुन्हा रहित केला होता. त्या निर्णयच्या विरोधात याचिकाकर्ते हैदर अली यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने वरील प्रश्‍न विचारला.

१. न्यायालयाने प्रकरण समजून घेतांना याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांना विचारले की, ‘जय श्रीराम’ची घोषणा देणे गुन्हा कसा असू शकतो ?’ त्यावर अधिवक्ता कामत म्हणाले की, हे दुसर्‍या धर्माच्या प्रार्थनास्थळात बलपूर्वक घुसून धमकावण्याचे प्रकरण आहे. तिथे स्वतःच्या धर्माची घोषणा देऊन आरोपींनी धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ४८२ चा चुकीचा वापर झाला आहे. प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण होण्याआधी उच्च न्यायालयाने गुन्हा रहित केला.

२. त्यावर न्यायालयाने म्हटले, ‘आरोपींच्या विरोधात काय पुरावे आहेत, ते आम्हाला पहावे लागेल. त्यांची कोठडी मागतांना पोलिसांनी सत्र न्यायालयाला काय सांगितले होते ?’, अशी विचारणा केली. त्यावर अधिवक्त्यांनी सांगितले की, ‘सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात आरोपी घोषणा देतांना दिसून आले होते.’ यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी पुढच्या मासामध्ये ठेवली.