Hapur Ghar Wapasi : हापूड (उत्तरप्रदेश) येथे ४५ कुटुंबांनी मुसलमानांनी स्वीकारला सनातन धर्म !

हापूड (उत्तरप्रदेश) – येथील सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबातील ४५ कुटुंबांनी इस्लाम सोडला आणि सनातन धर्म स्वीकारला. धर्मपरिवर्तनानंतर सलमान खान यांनी  स्वतःचे नाव पालटून संसार सिंह असे ठेवले आहे. तसेच आजोबांचे नाव श्यामलाल सिंह ठेवले. आजोबांच्या मृत्यूनंतर ब्रजघाट येथे हिंदु परंपरांनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर त्यांचा अस्थीकलश विसर्जित करण्यात आला आणि त्यांनी प्रथमच गंगेत स्नान करून स्वतःची शुद्धी केली अन् सनातन धर्म स्वीकारला. त्यांना त्यांचे गोत्र ठाऊक नसल्याने ते भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या नावाने गौरीशंकर गोत्र धारण करून घरी परतले.

संसार सिंह म्हणाले, ‘‘आता देशातील हिंदूंचे हित सुरक्षित असून ते सनातन धर्म स्वीकारण्यात धन्यता मानत आहेत.’’ त्यांचे कुटुंब मूळचे इस्लामाबाद (पाकिस्तान) येथील आहे. त्यांचे पूर्वज हिंदू होते; पण मोगलांनी त्यांना मुसलमान होण्यास भाग पाडले. इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर, देशाची फाळणी झाल्यावर कुटुंबाने भारतात रहाण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण कुटुंब इस्लामाबादहून आले अन् देहलीमध्ये स्थायिक झाले. त्यात आता सुमारे १५० सदस्यांसह ४५ हून अधिक कुटुंबे आहेत. संसार सिंह यांच्या म्हणण्यानुसार सुमारे ४ वर्षांपूर्वी सर्वांनी इस्लाम सोडण्याचा आणि सनातन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता; परंतु काही लोकांच्या विरोधामुळे त्यांचे कुटुंबीय सनातन धर्म स्वीकारण्यावरून चिंतेत होते. शेवटी त्यांच्या आजोबांनी ठरवले की कुटुंबातील सदस्य आता हिंदु परंपरांनुसार उपवास, सण आणि इतर विधी पाळतील. यासमवेतच त्यांच्या मृत्यूनंतर ब्रजघाटावर त्यांचे अंत्यसंस्कार करून त्यांचे नाव वंशावळीत नोंदवावे, असा ठरावही करण्यात आला. त्यांच्या इच्छेनुसार संसार सिंह यांनी त्यांचे अंतिम संस्कार केले. यानंतर पुजारी अंकुर शर्मा यांच्या वंशावळीत कुटुंबातील सदस्यांची नावे नोंदवण्यात आली.

सनातन धर्मात परतल्याचा अभिमान वाटतो !

संसार सिंह आणि संजू म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमुळे आमच्या पूर्वजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. आमच्या कुटुंबातील सदस्य अनेक वर्षांपासून स्वधर्मात परतण्याचे स्वप्न पाहत होते; परंतु ते धाडस दाखवू शकले नाहीत; पण आता देशातील हिंदूंचे हित सुरक्षित असून ते सनातन धर्म स्वीकारण्यात धन्यता मानत आहेत.

संपादकीय भूमिका

  • ज्यांच्या पूर्वजांना मुसलमान आक्रमकांनी बलवूर्पक बाटवून मुसलमान आणि ख्रिस्ती बनवले होते आणि त्यांच्या वंशजांना आता परत हिंदु धर्मांत यायचे आहे, अशांसाठी आता केंद्र सरकारने विशेष योजना राबवणे आवश्यक आहे !
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात साडेतीनशे वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरणाच्या चळवळीला आता राजाश्रय मिळणे आवश्यक झाले आहे !