|
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ मिशन चालू करून ‘एक हैं तो सेफ हैं’चा (‘एकत्र असलो, तर सुरक्षित राहू’) मंत्र दिला. त्या आधारे आपण विकासाच्या दृष्टीने पुष्कळ काही करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हा मंत्र घेऊन चालायला हवे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ‘वांद्रे-कुर्ला संकुला’तील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे आयोजित ‘वर्ल्ड हिंदु इकोनॉमिक फोरम’च्या वार्षिक परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते.
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की,
१. गोव्यात पूर्वी धर्मांतराच्या घटना जेव्हा मोठ्या प्रमाणात होत होत्या, मंदिरे तोडली जात होती, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी त्याला रोखण्याचे काम केले. यापुढे परत असे होणार नाही, असा करार त्यांनी पोर्तुगिजांशी केला. त्यानंतर गोव्यात पुन्हा अशा घटना घडल्या नाहीत.
२. शिवजयंती आणि शिवराज्याभिषेकोत्सव साजरा करणारे महाराष्ट्रानंतर गोवा हेच राज्य असावे, असे मला वाटते.
३. ‘समान नागरी कायदा’ देशात लागू होणे आवश्यक आहे. गोव्यामध्ये लागू झाल्यानंतर कुठल्याही धर्म किंवा जाती यांना त्याचा त्रास झाला नाही. देशभरात ‘समान नागरी कायदा’ लवकरात लवकर लागू व्हायला हवा.
४. जगात कुठेच असे ‘स्टॉक मार्केट’ (शेअर बाजार) नाही, जे भारतात आहे. भारतातील नागरिकांचा तळागाळातील उद्योजकांवर विश्वास आहे. त्यामुळे ते मोठ्या विश्वासाने त्यांच्या आस्थापनांत आपली गुंतवणूक करतात. उद्योजकांवरील विश्वास हाच भारताला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहे. येत्या ५० वर्षांत भारताची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होईल.