बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी ‘युनो’ने हस्‍तक्षेप करावा !

  • सकल हिंदु जनजागरण समितीची मागणी

  • छत्रपती संभाजीनगर येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचाराच्‍या विरोधात धर्मगुरूंच्‍या उपस्‍थितीत आंदोलन !

 

जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर करण्‍यात आलेले. ‘लक्षवेधी आंदोलन’

छत्रपती संभाजीनगर – बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात सकल हिंदु जनजागरण समितीच्‍या वतीने १० डिसेंबर या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ‘लक्षवेधी आंदोलन’ करण्‍यात आले. या आंदोलनात विविध धर्मांचे ५ धर्मगुरु उपस्‍थित होते. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्रांनी (‘युनो’ने) हस्‍तक्षेप करावा, अशी मागणी या वेळी संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी केली.

सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज म्‍हणाले, ‘‘बांगलादेशात कोरोनाच्‍या काळात इस्‍कॉन मंदिरांतून ज्‍यांनी (चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु) जेवण पुरवले, त्‍यांच्‍यावर हे लोक उलटले आहेत. कानिफनाथ, सप्‍तशृंगी गडावर वक्‍फ बोर्डाच्‍या वतीने दावा सांगण्‍यात येत आहे. सनातनी एकत्र झाले, तर काय होते, याचा निर्णय २३ नोव्‍हेंबर या दिवशीच्‍या विधानसभा निवडणुकीत दिसला आहे.’’ आंदोलनामुळे ३ घंटे रस्‍ता बंद करण्‍यात आला होता. आंदोलनासाठी १ सहस्र ५०० पोलिसांचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

आंदोलनाकरिता जमलेले धर्मप्रेमी

४०० अधिवक्‍त्‍यांनी निवेदन दिले ! 

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठातील अधिवक्‍ता परिषदेने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन दिले. महाराष्‍ट्र आणि गोवा अधिवक्‍ता परिषदेचे माजी अध्‍यक्ष अधिवक्‍ता नितीन चौधरी, अधिवक्‍ता परिषदेच्‍या खंडपीठ शाखेचे मंत्री अधिवक्‍ता स्‍वप्‍नील जोशी, खंडपीठ अधिवक्‍ता संघाचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता अविनाश बोरूळकर यांच्‍यासह अनुमाने ४०० अधिवक्‍ता प्रतिनिधींनी निवेदन दिले.

परभणी येथे मोर्चा !

परभणी येथे मोर्चा काढतांना हिंदुत्वनिष्ठ

परभणी – बांगलादेशातील हिंसाचाराच्‍या विरोधात आंदोलकांनी बांगलादेशाचा ध्‍वज जाळून निषेध नोंदवला. जिल्‍ह्यातील उमरगा, उदगीर, चाकूर येथे बंद पाळण्‍यात आला, तर रेणापूर येथे निदर्शने करण्‍यात आली. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने, सराफा बाजार, भाजी मंडई बंद ठेवण्‍यात आली होती. लातूर, धाराशिव, नांदेड, जालना, बीड या जिल्‍ह्यांतही मोर्चे निघाले. परभणी येथील मोर्चात धर्मगुरूंसह सहस्रों हिंदू सहभागी झाले होते. धर्मगुरूंनी बांगलादेशातील घटनांचा निषेध केला. जैन मुनी मोक्षतिलक विजयजी, डॉ. धनंजय पुरी, भागवताचार्य बाळू महाराज असोलेकर, श्री. माधव घोडके, स्‍वामी अद्वैत चैतन्‍य, श्री पुरुषोत्तम महाराज झाडगावकर आदी सहभागी झाले होते. प्रशासनाला मागण्‍यांचे निवेदन दिले.

हिंगोली येथे युनूस यांच्‍या प्रतिमेला जोडे मारले !

हिंगोली – येथे ‘हिंदु आक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला. आंदोलकांनी बांगलादेशाचा ध्‍वज आणि बांगलादेश सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्‍या प्रतिमेला जोडे मारले. जिल्‍हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन दिले. या वेळी आंदोलकांनी ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा दिल्‍या.