बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार इस्लामविरोधी ! – Maulana Mahmood Asad Madani

जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांचे विधान

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मौलाना महमूद असद मदनी

किशनगंज (बिहार) – जर बांगलादेशात मुसलमानांनी मुसलमानेतरांवर अन्याय केला असेल, तर ते मुसलमान इस्लामच्या विरोधात आहेत. केवळ बांगलादेशालाच नाही, तर प्रत्येक देशाला अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्याचे मी आवाहन करतो. त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मानाचा अधिकार हिरावून घेऊ नका. अल्पसंख्यांकांवर आक्रमण करणे इस्लाममध्ये मान्य नाही, असे विधान ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना केले.

मौलाना मदनी म्हणाले की,

१. कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी न्याय सर्वांत महत्त्वाचा आहे. रस्ते आणि विकास महत्त्वाचा आहे; पण जात आणि धर्म यांच्या आधारावर माणसांमध्ये भेदभाव होत राहिला, तर तो देशाचा सर्वांत मोठा विश्‍वासघात ठरेल. (मुसलमानांमध्ये अनेक जाती आहेत, संप्रदाय आहे. शिया आणि सुन्नी हा वाद तर इस्लामच्या प्रारंभापासूनचा आहे आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांचा जीव गेला आहे. इस्लाममधील जातींमुळे त्यांच्या मशिदीही वेगळ्या आहेत. याविषयी मदनी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक)

२. आज रस्त्यावर चालतांना मुसलमानांना त्रास होतो. त्यांना प्रत्येक पावलावर द्वेषाचा सामना करावा लागत आहे. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! देशात मुसलमानबहुल भागांत मुसलमान आरोपीला पकडण्यासाठी जातांना पोलिसांनाही भीती वाटते. तेथे पोलिसांवर आक्रमणे केली जातात. मदरशांमध्ये आतंकवादी लपवले जातात, याविषयी मदनी का बोलत नाहीत ? – संपादक)

३. राजकीय लाभासाठी देशाचा एकोपा बिघडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे, तो होऊ नये. (देशाचा एकोपा टिकवण्यासाठी काश्मीरमधील मुसलमानांनी काय केले आहे, हे मदनी यांनी सांगावे ! तेथील मशिदींवरील भोंग्यांवरून धमकी देऊन हिंदूंना त्यांच्या बायका आणि संपत्ती सोडून जाण्यास सांगण्यात आले होते. ते काय होते ? तो एकोपा होता का ? आजही हिंदू तेथे रहायला जाऊ शकत नाहीत. हिंदू तेथे पुन्हा रहायला जातील, यासाठी मदनी आणि त्यांची संघटना काय प्रयत्न करणार आहेत ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • हिंदूंवर होणारे अत्याचार इस्लामविरोधी आहेत, तर ते गेले अनेक शतके म्हणजे भारतात इस्लामचा प्रवेश झाल्यापासूनच होत आहेत. याचाच अर्थ जे इस्लामच्या नावाखाली हिंदूंवर अत्याचार करत आहेत, ते सर्वच इस्लामविरोधी आहेत, असे म्हणायचे का ?
  • अशा इस्लामविरोधी लोकांच्या विरोधात जमियत उलेमा-ए-हिंद रस्त्यावर उतरून कार्य का करत नाही ? भारतात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीच्या ठिकाणी होणार्‍या आक्रमणे रोखण्यासाठी जमियत उलेमा-ए-हिंद प्रयत्न का करत नाही ?