कोल्हापूर, ७ डिसेंबर (वार्ता.) : वैद्यकीय क्षेत्रात वर्ष १९८६ पासून कार्यरत असलेल्या ‘वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल’च्या वतीने ‘आरोग्य पंधरवडा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या शिबिरामध्ये प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. अमित बुरांडे हे मणका विकार, मधुमेह रुग्ण आणि त्या अनुषंगाने होणार्या रोगांची पडताळणी करणार आहेत. यात गुडघे आणि खुब्यांचीही पडताळणी होणार असून गुडघा आणि खुबा पालटाची शस्त्रक्रिया केवळ ९० सहस्र रुपयांमध्ये होणार आहे. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘श्री महालक्ष्मी हेल्थ फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी डॉ. शैलजा खुटाळे आणि डॉ. वीरेंद्र वणकुद्रे उपस्थित होते.
श्री. संतोष कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘‘सध्याच्या आधुनिक काळात नूतनीकृत केलेल्या रुग्णालयात मोतींबिंदूचे शस्त्रकर्म केवळ ४ सहस्र रुपयांत करण्यात येणार आहे. आमच्याकडे अतीदक्षता विभाग असून ५० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय आहे. स्वर्गीय शा.कृ. पंत वालावलकर यांनी गोरगरीब रुग्णांची सेवा व्हावी, यासाठी या धर्मादाय रुग्णालयाची स्थापना केली. या रुग्णालयात अत्याधुनिक ‘डिजिटल एक्स रे’ केवळ २५० रुपयांमध्ये होणार आहे. येथे अतिशय अल्प दरात ‘पॅथॉलॉजी विभाग’ चालू असून कोणत्याही पडताळणीनंतर लागणार्या उपचारांसाठी भरीव सवलत दिली जाईल, तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.’’
शासनाच्या वतीने धर्मादाय रुग्णालय म्हणून ज्या विविध शस्त्रकर्मांसाठी, तसेच उपचारांसाठी जे लाभ देण्यात येतात, ते या रुग्णालयास देण्यात येत नाहीत. हे लाभ आमच्या रुग्णालयास मिळाल्यास अनेक गरजूंना त्याचा लाभ होईल, असे श्री. कुलकर्णी या प्रसंगी म्हणाले.