मुंबई – नक्षलवादी भारतातील व्यवस्थेवरील विश्वास तोडून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यघटनेने ज्या संस्थांना देशात स्वायत्त अधिकार दिले आहेत, त्यांवरील विश्वास तोडण्यासाठी राहुल गांधी कार्यरत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रा ही भारतात अराजक निर्माण करण्यासाठी होती, असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘न्यूज लोकमत १८’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘भारताला तोडण्यासाठी प्रयत्न करणारे लोकच राहुल गांधी यांचे भाषण बनवून देत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारतविरोधी बोलतात. भारत ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे ते म्हणतात; मग बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? याचे कारण राहुल गांधी यांची धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘हिंदूंना शिव्या देणे’ होय. राहुल गांधी यांची धर्मनिरपेक्षता म्हणजे बहुसंख्यांकांचा अधिकार नाकारणे आणि हिंदूंवर अन्याय करणे ही आहे. कुणी ‘व्होट जिहाद’ करण्याची धमकी दिली, तर मतांचे ‘धर्मयुद्ध’ होईल, हे लक्षात घ्यावे. हिंदू धर्मासाठी कधीही आक्रमक होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदूंचे नेतृत्व करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी देशातील हिंदूंमध्ये विश्वास निर्माण केला. जे हिंदू मंदिरात जाण्यास घाबरत होते; मात्र सद्य:स्थितीत तेच विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत.’’
मतदानयंत्राला दोष देणे मूर्खपणाचे !
स्वत:च्या अपयशाला दुसर्याला दोष देणारे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ‘इ.व्ही.एम्.’विषयीची (मतदानयंत्राविषयीची) भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे ‘इ.व्ही.एम्.’ला दोष देणे मूर्खपणाचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.