‘साधकांची आध्‍यात्मिक उन्‍नती व्‍हावी’, यासाठी त्‍यांना सर्वतोपरी साहाय्‍य करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी !

‘मार्गशीर्ष शुक्‍ल चतुर्थी (५.१२.२०२४) या दिवशी सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधिकेला घडलेले त्‍यांच्‍यातील गुणांचे दर्शन येथे दिले आहे. 

पू. संदीप आळशी यांच्‍या ५० व्‍या वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍या चरणी सनातन परिवाराच्‍या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

१. चैतन्‍यमय वाणी 

सौ. मंजिरी आगवेकर

‘पू. संदीपदादा नेहमी हळू आवाजात आणि एका लयीत बोलतात. साप्‍ताहिक कार्यसत्‍संगात पू. दादा आम्‍हाला आमच्‍या चुकांची जाणीव करून देत असतांना किंवा साधनेच्‍या संदर्भात मार्गदर्शन करत असतांना त्‍यांच्‍या बोलण्‍याच्‍या लयीत पालट होत नाही. पू. संदीपदादा बोलत असतांना काही वेळा मला ‘प.पू.च (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) बोलत आहेत’, असे वाटते.

एका प्रसंगात मला माझ्‍यातील स्‍वभावदोष लक्षात येऊनही त्‍यांवर मात करता येत नव्‍हती. तेव्‍हा मी पू. दादांचे मार्गदर्शन घेतले. पू. दादांनी सांगितलेले साधनेचे दृष्‍टीकोन याआधीही मला ठाऊक होते; मात्र ‘पू. दादांच्‍या वाणीतून ते शब्‍द आल्‍यावर ते शब्‍द आणि चैतन्‍य माझ्‍यावर आपोआप कार्य करत आहेत. पू. दादा मला ‘तो प्रसंग आणि त्‍याच्‍याशी संबंधित स्‍वभावदोष’ यांतून बाहेर काढत आहेत’, याची मला अनुभूती आली.

२. आधार देणे 

पू. संदीपदादा सर्वांशी सहजतेने आणि प्रेमाने बोलतात. साधक त्‍यांच्‍याशी मनमोकळेपणाने बोलतात. ‘साधकांना व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना यांत असलेली अडचण त्‍यांनी पू. संदीपदादांना सांगितल्‍यावर सुटतेच’, याचा प्रत्‍यय अनेक वेळा येतो.

३. साधकांची आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी त्‍यांना सर्वतोपरी साहाय्‍य करणे 

‘प्रत्‍येक साधकाची आध्‍यात्मिक उन्‍नती व्‍हावी’, अशी तळमळ पू. दादांना असते. ते साधकांच्‍या अडचणी समजून घेऊन त्‍यावर उपाययोजना सांगतात. साधकांकडून झालेल्‍या चुका ते संबंधित साधकांना सांगतात. पू. दादा साधकांना प्रत्‍येक चुकीच्‍या मुळापर्यंत नेऊन संबंधित साधकांना त्‍यांचे स्‍वभावदोष लक्षात आणून देतात. पू. दादा ‘साधकांचे साधनेचे प्रयत्न होत आहेत कि नाहीत’, याचा मधून मधून आढावा घेतात. ‘साधकांनी भावाच्‍या स्‍तरावर प्रयत्न करायला हवेत’, यासाठी पू. दादा अधून मधून ‘प.पू. डॉक्‍टरांनी त्‍यांना कसे घडवले !’, याविषयी सांगतात. ‘एखाद्या साधकाने कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी ते अचूक मार्गदर्शन करतात.

४. साधकांचे कौतुक करून त्‍यांना प्रोत्‍साहन देणे 

पू. दादा साधकांनी केलेल्‍या चांगल्‍या सेवेचे कौतुक करून साधकांचा उत्‍साह वाढवतात. ते साधकांना प्रयत्न करण्‍यासाठी वेळोवेळी प्रोत्‍साहन देतात.

५. शिष्‍यभाव 

पू. दादांकडे ग्रंथ आणि कला यांच्‍याशी संबंधित सेवांचे दायित्‍व आहे. ते एकाच वेळी ग्रंथ आणि कला यांच्‍याशी संबंधित सेवा करतात; मात्र ते कधीच स्‍वतःकडे कर्तेपणा घेत नाहीत. ते नेहमी शिष्‍यभावात असतात. ते म्‍हणतात, ‘‘मी काहीच करू शकत नाही. प.पू. डॉक्‍टरच सर्वकाही करतात.’’ पू. दादांना अनेक शारीरिक आणि आध्‍यात्मिक त्रास होत असतात, तरीही ते त्‍याचा परिणाम सेवेवर होऊ देत नाहीत.

६. कृतज्ञता आणि प्रार्थना 

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आम्‍हाला त्‍यांचे प्रतिरूप असलेल्‍या पू. संदीपदादांचा सत्‍संग दिला’, याबद्दल आम्‍ही साधक त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो. पू. दादांना अपेक्षित असे प्रयत्न करण्‍यात आम्‍ही न्‍यून पडतो. ‘पू. दादांनी केलेल्‍या मार्गदर्शनानुसार आमच्‍याकडून कृतीच्‍या स्‍तरावर प्रयत्न होऊ देत’, अशी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. मंजिरी विनायक आगवेकर (वर्ष २०२४ मधील आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२३)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.