विशेष लेखमालिका
बांगलादेशी घुसखोरी थांबवण्याकरता अनेक उपयुक्त सूचना या लेखात देण्यात आल्या आहेत; पण जे उत्तरदायित्व सगळ्यांवर टाकले जाते, त्यावर ‘ते माझे कर्तव्य नाही’, असे म्हणून बहुतांश लोक हात झटकून मोकळे होतात. म्हणून या प्रकरणात काही महत्त्वाचे उत्तरदायित्व वेगवेगळ्या समाजघटकांकडे वाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे घटक अशा प्रकारे आहेत, ‘सरकार-शासनकर्ते, राजकीय पक्ष, नोकरशाही, न्यायालये, सामाजिक संस्था इत्यादींचे उत्तरदायित्व; माध्यमांचे (वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, सामाजिक माध्यमे यांचे) उत्तरदायित्व, पोलीस आणि अर्धसैनिक दले, सीमा सुरक्षा दल यांचे उत्तरदायित्व आणि सामान्य नागरिकांचे उत्तरदायित्व.’
(भाग ५)
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/859787.html
१. सरकार
शासनकर्ते, राजकीय पक्ष, नोकरशाही, न्यायालये, सामाजिक संस्था इत्यादींचे उत्तरदायित्व.
अ. अंतर्गत सुरक्षा आणि बांगलादेशी घुसखोरीविरुद्ध लढाईकरता वेगळे खाते आणि मंत्री.
आ. सर्वांत कर्तबगार मंत्री आणि त्यानुरूप नोकरशाही या खात्यामध्ये असावी. कठीण निर्णय घ्यायला अनुमती असावी.
इ. प्रत्येक बांगलादेशी घुसखोरग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यात महिन्यातून न्यूनतम १५ दिवस असावेत. त्या पालकमंत्र्यांच्या कामावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष असावे.
ई. केंद्रस्तरावर एक संयुक्त मुख्यालय, सगळ्या राज्यातील पोलिसांवर नियंत्रण ठेवण्याकरता असावे. त्यांच्या कामाचा आढावा घेतला जावा.
उ. बांगलादेशी शोध अभियान युद्धस्तरावर आखून त्याची कार्यवाही करावी.
ऊ. समाजात सगळ्या घटकांना बांगलादेशी शोधण्याच्या मोहिमेत सामील करावे.
ए. बांगलादेशी घुसखोरीग्रस्त भागात ग्रामसुरक्षा दले, होमगार्ड, पोलीस, अर्धसैनिक दले यांची संख्या वाढवून सामान्य नागरिकांना सुरक्षा द्यावी.
ऐ. बांगलादेशी घुसखोरीला समर्थन देणार्या संस्थांवर बंदी घालावी. राष्ट्रविरोधी आणि बांगलादेशी घुसखोर समर्थक लेख लिहिणारे लेखक अन् बोलणारे यांवर लक्ष असावे. बांगलादेशी घुसखोर समर्थक पुस्तके, मासिके, भित्तीपत्रके, संकेतस्थळे यांवर कायदेशीर कारवाई करावी.
ओ. पकडलेल्या बंगलादेशी घुसखोरांविरुद्धचे न्यायालयातील खटले एक मासात निकाली काढावे. आतंकवादविरोधी आणि विशेष कायदेही सिद्ध करावेत. न्यायालयांच्या काही विचित्र निर्णयांमुळे अनेक बांगलादेशी घुसखोर समर्थक संस्थांना बळ मिळत आहे. त्यावर फेरविचार, राज्यघटनेचे रक्षण हे न्यायालयाचेही उत्तरदायित्व आहे. विनाकारण खटले प्रलंबित ठेवणार्या अधिवक्त्यांवर कारवाई करावी. बांगलादेशी घुसखोरांच्या मानवी हक्कांच्या मर्यादा निश्चित कराव्यात.
औ. वर्ष १९७० पासून बांगलादेशी घुसखोरी होत आहे. तेव्हापासूनचे मंत्री, नोकरशाही, पोलीस जे सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना आपल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून त्या भागात बंगलादेशी घुसखोर शोधण्याकरता किंवा सामान्य जनतेची सेवा करायला पाठवावे.
क. स्थानिक नागरिकांना बंगलादेशी घुसखोरांची गुप्त माहिती देण्यासाठी एक ‘टोल फ्री’ दूरभाष क्रमांक दिला पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोचवू शकतात. त्यांच्या नावांविषयी गुप्तता बाळगली पाहिजे.
ख. बांगलादेशी घुसखोरांकडून महिला, लहान मुले आणि इतर सामान्य यांवर अत्याचार होतात. त्यावर नजर ठेवून त्यांना शिक्षा देणे.
ग. बांगलादेशी घुसखोर समर्थकांवर सामाजिक बहिष्कार. राजकीय पक्षांनी मतपेढीसाठी काही लोकांना जवळ केले आहे. या बोटचेप्या भूमिकेमुळे बांगलादेशींची घुसखोरी फोफावत आहे. राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी देशातील सर्वांनी गट-तट विसरून एकत्र आले पाहिजे. मेणबत्त्या जाळून किंवा घोषणा देऊन बांगलादेशी घुसखोरविरोधी अभियानात यश मिळणार नाही. त्याकरता कृतीशील कारवाईची आवश्यकता आहे. बांगलादेशी घुसखोरांविरुद्धची लढाई ही अशी अनेक आघाड्यांवर आणि दीर्घकाळ लढावी लागणार आहे.
२. माध्यमांचे (वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, सामाजिक माध्यमांचे) उत्तरदायित्व
बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध लढाई लढण्यास प्रसिद्धीमाध्यमे साहाय्य करू शकतात. देशद्रोही संघटना आणि कथित विचारवंत यांविरुद्ध शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अन्वेषण करून त्यांच्या देशद्रोही कारवाया उघडकीस आणल्या पाहिजेत. माध्यमांनी क्रिकेट, सिनेमा, हिंसाचार आणि वलयांकित व्यक्ती यांच्यावरील लक्ष न्यून करून बांगलादेशी घुसखोरग्रस्त भागात थोडे लक्ष केंद्रित केले, तर सर्वांचाच लाभ होईल.
३. पोलीसदलाचे उत्तरदायित्व
अ. पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या रिक्त जागा कालबद्ध कार्यक्रमांतर्गत भरल्या जाव्यात.
आ. पोलीसदलात हुशार अधिकार्यांना प्राधान्याने स्थान दिले जावे. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, यासाठी त्यांच्या सुविधांमध्ये वाढ केली जावी.
इ. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडू नये, यासाठी कर्तव्याचे घंटे निर्धारित केले जावेत. त्यांच्या सुट्या आवश्यकतेप्रमाणे संमत केल्या जाव्यात आणि त्यांना मानसिक शांती प्रदान करून एकूणच पोलीसदलाची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न व्हावा.
ई. पोलिसांची निवड करतांना त्यांची मानसिक चाचणीसुद्धा घ्यायला हवी. त्यांना नैतिक मूल्यांचेही शिक्षण द्यावे.
उ. पोलीसदलातील राजकीयीकरण, गुन्हेगारी, भ्रष्टाचार थांबवून गुन्हेगारांना शिक्षा; अतीमहनीय व्यक्तींची सुरक्षा आणि प्रशासकीय कामापासून मुक्ती; त्यांचे लक्ष गुप्तहेर माहिती गोळा करणे, सामान्यांची सुरक्षा आणि बांगलादेशी घुसखोरीविरोधी अभियान यांवर हवे.
ऊ. पोलीस महासंचालकांना स्वतःचे काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य. अत्याधुनिक साधने त्यांना मिळाली पाहिजेत. नवीन तंत्रज्ञान मुख्यत्वे रात्री दिसण्याकरता ‘नाईट व्हिजन’ आणि ‘इंटरसेप्टन’ देणे.
ए. पोलिसांचे अर्धसैनिकीकरण आणि अर्धसैनिक दलाचे सैनिकीकरण करणे. त्यासाठी नियोजन, नेतृत्व, प्रशिक्षण आणि कार्यवाही करणे आवश्यक आहे.
ऐ. बांगलादेशी घुसखोरीविरोधी अभियानात थोडे यश मिळाले, तरच पोलिसांचे मनोधैर्य आणि कार्यक्षमता वाढेल.
४. अर्धसैनिक दलांचे उत्तरदायित्व
अ. स्थानिक जनता सुरक्षादलाच्या बाजूने असणे फार महत्त्वाचे असते. अशा भागात अनेक नागरिक बांगलादेशी घुसखोरांच्या बाजूने असतात. या भागात काम करणार्या सैनिकांद्वारे नवीन कल्पना वापरून यशाचे प्रमाण वाढवण्यात येऊ शकते. याकरता सगळ्यांच्या बुद्धीचा वापर ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ने (विचारमंथनाने) करता येतो. असे मासामध्ये न्यूनतम एकदा नियमितपणे केले, तर पोलिसांना बांगलादेशी घुसखोरांना शह देता येईल आणि त्यांच्या एक चाल पुढे रहाता येईल, तसेच डावपेचांद्वारे त्यांच्यावर मात करता येईल.
आ. प्रत्येक पोलिसाने उत्तम गुप्तहेर बनणे महत्त्वाचे. गुप्तहेरांचे जाळे जितके अधिक पसरेल तेवढे चांगले.
इ. प्रत्येक पोलीस ठाण्यात, जिल्ह्यात आणि प्रत्येक मुख्यालयात एक बांगलादेशी घुसखोरीविरोधी पथक सिद्ध करावे. २५ टक्के सैनिक आणि अधिकारी यांना हे काम दिले जाऊ शकते. त्यांचे मुख्य काम असेल बांगलादेशी घुसखोरवाले पुढच्या एक मासात काय करतील, यावर विचार करणे. त्यामुळे आपल्याला येणार्या परिस्थितीला नीटपणे तोंड देता येईल. सैन्यामध्ये एक पद्धत वापरली जाते. प्रत्येक अधिकार्यांच्या कार्यालयात त्या त्या भागातील सर्वांत कुख्यात आतंकवाद्यांची छायाचित्रे लावली जातात आणि प्रतिदिन त्यासमोर बसून त्यांच्यावर कशी मात करता येईल, हा विचार करण्यात येतो. कुठलीही नवीन योजना वापरण्याच्या आधी त्यावर पूर्ण विचार केला जातो.
५. सामान्य नागरिकांचे उत्तरदायित्व
अ. प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरता प्रतिदिन काही वेळ व्यय करायला हवा.
आ. प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनावे. आपण जर सुरक्षादलांचे कान आणि डोळे बनलो, तर आपला भाग सुरक्षित होऊ शकतो. बांगलादेशी घुसखोरांना कसे ओळखावे, याचे प्रशिक्षण पोलीस नागरिकांना देऊ शकतील.
इ. अकार्यक्षम सरकारी अधिकार्यांची माहिती वरच्या अधिकार्यांना आणि लोकप्रतिनिधींना द्यावी.
ई. विकास योजनांच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवावे. भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी, पोलीस, भ्रष्टाचारविरोधी खाते, पत्रकार आणि नेते यांना द्यावी.
उ. बांगलादेशी घुसखोरीग्रस्त भागाच्या बाहेर असलेल्या नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास साहाय्य करावे. बांगलादेशी घुसखोरीवादी कथित विचारवंत आणि समर्थक यांच्याशी वैचारिक लढाई आमने सामने, वृत्तपत्रांना पत्रे लिहून, टीव्हीवर चर्चेत सहभाग घेऊन करावी. जे बांगलादेशी घुसखोरीच्या विरुद्ध लढण्यास सज्ज नाहीत, असे राजकीय पक्ष आणि नेते यांना जनतेने मतदान न करून धडा शिकवायला हवा.
६. सामान्य नागरिकांनी सैनिक, गुप्तहेर म्हणून कान आणि डोळे उघडे ठेवण्याची आवश्यकता
आज ७० टक्के भारतीय हे सामाजिक माध्यमांवर आहेत. त्यांनी त्यांचे कान आणि डोळे सामाजिक माध्यमांवरही उघडे ठेवावेत. सामाजिक माध्यमांवर देशविरोधी लिखाण वाचनात आले वा तसे काही बघितले, तर लगेच त्याची ‘लिंक’ सायबर पोलिसांकडे पाठवा, जेणेकरून त्यावर कारवाई करणे त्यांना सोपे जाईल.
अजूनसुद्धा काही राजकीय नेते, वाट चुकलेले विचारवंत, तज्ञ हे देशविरोधी वक्तव्ये करून मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. सगळे पक्ष एकदिलाने सरकारच्या बाजूने उभे ठाकल्याचे दाखवतील; पण प्रत्यक्षात अनेक नतद्रष्ट नेते त्यात खोड्या काढतील.
(समाप्त)
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१३.११.२०२४)
संपादकीय भूमिकाबांगलादेशींची घुसखोरी थांबवण्यासाठी सरकार, पोलीस आणि प्रशासन यांच्यासह राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही सतर्क रहाणे महत्त्वाचे ! |