देहलीतील धर्म संसदेत द्वारका पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांचे विधान
नवी देहली – हिंदूंनी संघटित व्हावे. प्रत्येकाला देशात रहाण्याची अनुमती आहे. राज्यघटनेनुसार प्रत्येकाला वास्तव्य करता येते; पण जेव्हा आपली एकजूट मोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि एका विशिष्ट धर्माच्या माध्यमातून इतर धर्मांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा आपल्याला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार असला पाहिजे, असे विधान द्वारका पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांनी येथे केले.
१६ नोव्हेंबरला सायंकाळी येथे तिसर्या ‘सनातन धर्म संसदे’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शंकराचार्य बोलत होते. या धर्मसंसदेत देशातील ५० ते ६० संत, साध्वी आणि कथावाचक सहभागी झाले होते. कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी या धर्म संसदेचे आयोजन केले होते. देवकीनंदन यांनी ‘वक्फ बोर्डा’प्रमाणे ‘सनातन बोर्डा’ची स्थापना करण्याची मागणी केली. पुढील वर्षी प्रयागराज येथे होणार्या कुंभमेळ्यात चौथी धर्मसंसद आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, आपण (हिंदूंनी) जर आपला धर्म जाणला नाही, तर आपल्याला अपमानित व्हावे लागेल. इतर लोक आपल्यावर राज्य करत रहातील. सनातन धर्माचे पालन करणारेच मूळ भारतीय आहेत. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, ही वेगळी गोष्ट आहे; पण आपल्यावर आक्रमण करण्याचा अधिकार कुणालाही नाही. सरकारने घुसखोरी थांबवावी; कारण त्यांना मतदार बनून आपली लोकसंख्या अल्प करून राज्यकारभारात प्रवेश करायचा आहे.
हिंदूंच्या घरातील प्रत्येकाकडे शस्त्र आणि शास्त्र असले पाहिजे ! – प्रदीप मिश्रा, कुबेरेश्वर धाम
देवकीनंदन ठाकूर यांच्या माध्यमातून सनातन मंडळाची स्थापना करण्याच्या उद्देशाने ही बैठक झाली. तुमच्या घरात रहाणार्या सर्व सदस्यांकडे शस्त्र आणि शास्त्र दोन्ही असावेत. माझी सर्वांना विनंती आहे की, आपले देव शस्त्रांविना नाहीत; म्हणून तुम्ही शस्त्र आणि धर्मग्रंथ घेऊन फिरावे, असे आवाहन कुबेरेश्वर धामचे प्रदीप मिश्रा यांनी केले.
सनातनी आणि हिंदू यांंच्यासाठी भारत हे एकमेव सुरक्षित ठिकाण ! – महंत राजू दास, हनुमान गढी, अयोध्या
जागे व्हा, जर तुम्ही (हिंदू) जागे झाले नाहीत, तर तुम्हाला जम्मू-काश्मीरमधून जसे हाकलून दिले गेले आहे, तसे हाकलून दिले जाईल. आज तुम्हाला बांगलादेशातही मारले जात आहे, तसेच पळवून नेले जात आहे; पण भारतात असे झाले, तर तुम्ही भारतातून कुठे जाणार ? तुम्हाला इतर कुठेही जागा नाही. सनातनी आणि हिंदू यांंच्यासाठी भारत हे एकमेव सुरक्षित ठिकाण आहे, हिंदू धर्मनिरपेक्ष होऊन कसे चालेल ?, असा प्रश्न अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी विचारला.