संपादकीय : मुंबईतील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात !

नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने प्रकाशित केलेल्या एका अहवालातून मुंबईकरांसाठी अतिशय धक्कादायक ठरणारे वृत्त समोर आले आहे. बांगलादेश आणि म्यानमार येथून बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल, तर मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून वाढेल. अहवाल सादर करणारी संस्था जगविख्यात असल्याने तिच्या निष्कर्षाकडे डोळेझाक करून चालणार नाही. तिच्या निष्कर्षानुसार ‘मुंबईत रहाणार कोण ? मुंबईकर कि घुसखोर ?’, या प्रश्नावर प्रत्येक मुंबईकराने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त उघड झाल्याने मुंबईतील मतदारराजाला स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे. प्रत्येक मतदाराने सूज्ञ होऊन मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने सारासार विचार करून मत दिल्यासच ‘आपली मुंबई’ वाचवणे शक्य होणार आहे, अन्यथा ती ‘घुसखोरांची’ कधी होईल, हे कळणारही नाही. नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये इतकेच !

घुसखोरांचे आतिथ्य धोकादायक ! 

भारतात, पर्यायाने मुंबईत हे घुसखोर बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करतात. अन्य देशांमध्ये बेकायदेशीरपणे पाऊल टाकताच एकतर त्यांना हाकलून लावले जाते किंवा कठोर शिक्षा केली जाते. त्यामुळे ‘भारत हेच आपले सर्वार्थाने आश्रयस्थान आहे’, हे त्यांना पुरते ठाऊक असते. घुसखोर आधी ठराविक संख्येने प्रवेश करतात. अन्न, वस्त्र आणि निवारा यांची सोय झाल्यावर ते कुटुंबासह येथेच स्थायिक होतात. अर्थात् त्यांना ही सोय करून देणारे, त्यांच्यासाठी पायघड्या घालणारे, त्यांचे आदरातिथ्य करणारे हे सर्वस्वी भारतीयच असतात; पण या घुसखोरांचा उद्देश कोण लक्षात घेतो ? त्यांना भारताविषयी ना कळवळा आहे, ना त्यांना भारताचे नागरिक करून घेणार्‍यांप्रती सहानुभूती ! त्यांना केवळ येथे त्यांचे राज्य आणायचे आहे. अशा प्रकारे शत्रूला आपल्या घरात प्रवेश देऊन आपणच आपल्या पायांवर कुर्‍हाड मारून घेत आहोत. याला कारणीभूत आहे ती हिंदूंची अतीसहिष्णु वृत्ती !

या घुसखोरांना जन्मदराचे बंधन नसल्याने प्रतिदिन मोठ्या प्रमाणात त्यांच्या संख्येत भर पडत असते. एकदा का त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला की, त्यांना त्यांचे इप्सित साध्य करण्यासाठी हातात आयते कोलीतच मिळते. हळूहळू त्यांच्या कारवायांमुळे स्थानिक भागाची इस्लामबहुलतेकडे वाटचाल होऊ लागते. आसाम, बंगाल ही राज्ये इस्लामबहुल झालीच आहेत. आता झारखंडसह अन्य काही राज्येही इस्लामबहुल होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात मुंबईचीही भर पडणे, हे दुर्दैवी आहे. घुसखोर कुणाच्या तालावर नाचतात ? त्यांचा नेमका काय डाव आहे ? हे लक्षात घेऊन त्यांच्या घुसखोरीच्या राजकारणाला परावृत्त करायला हवे.

हिंदूंनो, कुणाच्या हाती सत्ता द्याल ? 

जेथून हे घुसखोर येतात, तेथे तर त्यांनी विध्वंसच माजवलेला आहे. बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी तेथून पलायन केले. त्यानंतर तेथील लोकांनी धुमाकूळ घातला. अल्पसंख्य हिंदूंवर आक्रमणे केली. हिंदूंची घरे जाळली. त्यांनी स्वतःतील उद्दामपणा, हिंदुद्वेष आणि हिंसक वृत्ती दाखवून दिली. याविरोधात भारतात कुणी आवाज उठवला का ? नाही. विदेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात अनेकदा भाजपचे नेतेच टीका करतात; पण अन्य पक्षांना आक्रमणे करणार्‍यांचा पुळका आलेला असतो. त्यांच्याकडून केवळ अन् केवळ मतांचेच राजकारण केले जाते. पॅलेस्टाईनमध्ये काही घडल्यास अत्याचार झाल्याचा कांगावा केला जातो; पण हिंदूंवर अत्याचार झाल्यास ‘अळीमिळी गुपचिळी’चे धोरण स्वीकारले जाते. हे असेच चालू राहिले, तर वर्ष २०५१ मध्ये वर्तवलेली संभाव्य स्थिती मुंबईत आताच निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. मुंबईकरांनी पर्यायाने हिंदूंनी वेळीच सावध व्हायला हवे. घुसखोर येथील उरलीसुरली शांतता किंवा स्थैर्य केव्हाच नष्ट करू शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. मतदानाचे भक्कम शस्त्र आपल्या हातात आहे. कुणाच्या हाती सत्ता द्यायची ? ते वेळीच ठरवायला हवे. घुसखोरांना पाठीशी घालून त्यांची पैदास होऊ देणार्‍यांना, ‘वक्फ बोर्डा’ला पाठिंबा देणार्‍यांना कि खर्‍या राष्ट्रभक्तांना, हिंदुत्व जपणार्‍यांना मत द्यायचे, हे ठरवायला हवे. ‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’ने महाविकास आघाडीला समर्थन देण्याच्या बदल्यात १७ मागण्या केल्या आहेत. काँग्रेसनेही त्यांना लेखी आश्वासन देत मागण्यांचा विचार करणार असल्याचे सांगितले. असे पक्ष सत्तेत आल्यास राज्य हिरव्या चादरीत गुंडाळले जाण्यास वेळ लागणार नाही. हे रोखण्यासाठी हिंदूंनीच कणखर होणे, काळाची आवश्यकता आहे.

मुंबई सुपात आहे, हे विसरू नका ! 

अनेक मुंबईकरांना वाटते की, मुंबई सुरक्षित आहे. कितीही आक्रमणे किंवा दंगली झाल्या, तरी मुंबई पुन्हा खंबीरपणे उभी रहाते; पण आज अन्य राज्ये जात्यात असली, तर मुंबई सुपात आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनी बिनधास्त रहाणे सोडून द्यावे. हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतातून अन्य देशांत जरी जायचे म्हटले, तरी तेथेही हिंदू सुरक्षित नाहीत. नुकत्याच कॅनडामधील हिंदूंना खलिस्तानी फुटीरतावादी लोकांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे समजते. हिंदूंनी या प्रकरणी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केल्यावर पोलिसांनी ‘सुरक्षा हवी असेल, तर ७० सहस्र डॉलर्स (४२ लाख रुपये) द्या’, असे सांगत हिंदूंकडे खंडणी मागितली. कॅनडातील हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे. भारत हाच देश हिंदूंसाठी सर्वार्थाने सुरक्षित आहे आणि तो तसाच ठेवणे, हे हिंदूंच्या हातात आहे. यासाठी घुसखोरांना पूर्णपणे प्रतिबंध करणे, त्यांच्यासाठी पायघड्या घालणार्‍यांवर कठोर कारवाई करणे, या उपाययोजना काढायला हव्यात. इतकी सर्व प्रतिकूल आणि चिंताजनक स्थिती असतांना ‘घुसखोर प्रतिबंधक कायदा’ होणे, हे अत्यावश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिले होते की, आमच्या सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एकेक बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना भाजप हद्दपार करणार आहे. त्यांनी या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे. भारतात पाऊल टाकण्याचे धाडस करणे दूरच; पण तो विचारही घुसखोरांनी करता कामा नये, यासाठी देशाने स्वतःचा धाक आणि वचक निर्माण करणेच कालसुसंगत ठरेल ! यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ‘मुंबई घुसखोरमुक्त’ करावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

‘घुसखोरमुक्त मुंबई’साठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन भारताने घुसखोरांचे षड्यंत्र उद्ध्वस्त करणे हेच कालसुसंगत !