कुंभकोणम् (तमिळनाडू) येथील सुरियानार मंदिराचे मठाधिपती महालिंग स्वामीगल यांनी विवाह केल्याचे प्रकरण
चेन्नई (तमिळनाडू) : कुंभकोणम् येथील प्रसिद्ध सुरियानार मंदिराचे ५४ वर्षीय मठाधिपती महालिंग स्वामीगल यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या बेंगळुरू येथील ४७ वर्षीय शिष्य हेमा श्री हिच्याशी विवाहबद्ध होऊन ब्रह्मचर्य व्रत मोडण्याचा निर्णय घेतला. मठाधिपतींच्या यांच्या विवाहाचे वृत्त पसरताच तमिळनाडूमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. तमिळनाडूतील शैव मठांच्या प्रमुखांनी त्यांचे शिष्य महालिंग स्वामीगल यांची सुरियानार मंदिराच्या मठाधिपतीपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांनी तमिळनाडू सरकारच्या ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागा’ला मठाचे प्रशासन कह्यात घेण्यासाठी एक पत्र लिहिले आहे. तसेच सुरियानार मंदिराचे व्यवस्थापन मंडळ आणि अनुयायी यांनी महालिंग स्वामीगल यांना मठाच्या मुख्यालयातून बाहेर काढले.
१. भक्तांनी त्यांना पदाचा त्याग करून शैव मठ सोडण्यास सांगितले आहे. हा मठ तमिळनाडूमध्ये शतकांपूर्वी स्थापन झालेल्या १८ शैव मठांपैकी एक आहे.
२. महालिंग स्वामीगल यांनी वर्ष २०२२ मध्ये सुरियानार मंदिराच्या मठाचे २८ वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी बेंगळुरू येथे हेमा श्री हिच्याशी विवाह केला. हेमा श्री मठाच्या निस्सीम भक्त होत्या.
३. तमिळनाडू सरकारच्या ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागा’चे मंत्री पी.के. सेकरबाबू यांनी सांगितले की, ते मंदिर आणि मठ यांचे प्रशासन कह्यात घेण्याच्या विषयावर कायदेतज्ञांचा सल्ला घेत आहेत आणि लवकरच त्यांचा निर्णय घोषित करणार आहेत. (जगभरात पाद्रयांकडून लहान मुले, महिला आदींचे लैंगिक शोषण करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या; मात्र कोणत्याच देशाच्या सरकारने तेथील चर्च सरकारच्या कह्यात घेतले नाही; मग भारतात कोणत्याही कारणाने सरकार मंदिरे कह्यात का घेत आहेत ? हिंदूंना याला विरोध करणे आवश्यक आहे ! – संपादक)