गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीपूर्वी मुंबईसह प्रमुख शहरांतील हवेची गुणवत्ता चांगली असल्याने यंदा फटाके फोडण्यावर तितकेसे निर्बंध आणण्यात आले नव्हते. ज्याचा लाभ मुलांसह तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणात उचलला. शेवटी अपेक्षित तेच झाले. फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील शिवडी, भायखळा, मालाड, कांदिवली, देवनार यांसारख्या भागातील हवेची गुणवत्ता कमालीची घसरून परिस्थिती चिंताजनक बनली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरून २०० ते ३०० च्या मध्ये गेला. लोकसंख्येची दाटीवाटी, विकासकामांमुळे हवेत मिसळलेले धूलिकण, वाढलेल्या वाहन संख्येमुळे प्रतिदिन होत असलेले वायूप्रदूषण आणि त्यातच फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषणाने गाठलेली कमाल मर्यादा यांमुळे दिवाळीच्या ४ दिवसांत गर्भवती स्त्रिया, वयस्क, दमा, हृदयविकार असलेल्या रुग्णांना जीव मुठीत घेऊन जगावे लागले. पुणे आणि ठाणे शहरांतील स्थितीही याहून वेगळी नव्हती. रात्री १० वाजल्यानंतर फटाके फोडण्यास बंदी असली, तरी शहरी भागांत दिवाळीच्या दिवसांत याही वर्षी रात्रभर फटाके वाजतच होते. खासगी, तसेच सरकारी दवाखान्यांसमोर रुग्णांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. प्रदूषणामुळे घसा खवखवणे, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, डोळे जळजळणे यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झालेले दिसून आले. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक होती.
प्रतीवर्षी फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात, ज्यामध्ये वित्त हानी तर होतेच याखेरीज काही वेळा आकस्मिक आग लागल्याने जीवितहानी होते, अपंगत्व, अंधत्व आणि बहिरेपणाही येतो. एकट्या संभाजीनगरमध्ये दिवाळीनिमित्त फटाके फोडतांना ४० जण भाजल्याच्या घटना दिवाळीच्या दिवशी घडल्या. त्यातील १९ रुग्णांना घाटी रुग्णालयात, तर २१ रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भुईनळ्याचा स्फोट झाल्याने एका १२ वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाला, तर सुतळी बाँब हातात फुटल्याने एकाचा पूर्ण हात भाजला. जळता फटाका रिक्शावर पडल्याने येथील एका रिक्शाने पेट घेतल्याची घटना यंदा समाजमाध्यमांवर चांगलीच प्रसारित झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ पुण्यात
३१ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी वित्तीय हानी मात्र कमालीची झाली आहे. कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरमजवळील मंदिर उत्सवाच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी करतांना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५० हून अधिक जण घायाळ झाले. फटाक्यांच्या दुष्परिणामांची जाणीव शाळा-महाविद्यालयांतून करून द्यायला हवी. दिवाळीला फटाके उडवण्यापेक्षा आध्यात्मिक दिवाळी साजरी करण्याचे ज्ञान पालकांनी आपल्या पाल्यांना करून द्यायला हवे.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.