दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांच्या संपन्नतेसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्या निमित्ताने देवी लक्ष्मीचे विश्वदर्शन…
१. भूमातेवर पाण्याचा वर्षाव करणार्या मेघांचे चित्र आणि लक्ष्मीवर पाण्याचा अभिषेक करणारे गज एकच !
पाऊस घेऊन येणारे प्रचंड काळे ढग हे भारतियांना आकाशात आक्रमण करणार्या हत्तीच्या कळपासारखे दिसले. ‘पावसाचे ढग, म्हणजे हत्ती’, असे एक समीकरणच झाले. ‘पावसाचा मेघ, म्हणजे गज’, ही कल्पना कवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’मध्येही दिसते. त्याच्या यक्षाला जेव्हा आकाशात मोठा काळा पावसाचा मेघ दिसला, तेव्हा त्याला तो ढग हत्तीसारखा भासला. तो म्हणतो,
‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।। – मेघदूत, श्लोक २
अर्थ : आषाढ मासाच्या पहिल्या दिवशी (यक्षाने) पर्वत शिखरावर झुकलेल्या, जणू ढुशी मारत असलेल्या हत्तीप्रमाणे दिसणार्या काळ्या मेघाला पाहिले.’
प्रतिवर्षी पावसाळ्यात हे गजरूपी मेघ आकाशात जमतात आणि पृथ्वीवर पाण्याचा वर्षाव करतात. त्या वर्षावाने नद्या भरभरून वाहू लागतात. भूमी सुजल होते. बीजांना अंकुर फुटतो. धान्य उगवते. भूमाता शुद्ध पाणी आणि अन्नधान्य उपलब्ध करून देते. भूमातेवर पाण्याचा वर्षाव करणार्या मेघांचे चित्र आणि लक्ष्मीवर पाण्याचा अभिषेक करणारे गज एकच आहेत. सर्व जीवांची जननी असलेल्या पृथ्वीमातेवर जलवर्षाव करणारे हत्ती हे पावसाचे ढग आहेत. चांगला पाऊस झाला की, भूमी ‘सुजलाम् सुफलाम्’ होते. आपल्याला फळे, फुले, मुळे, धान्य, पशू, गायी, गुरे इत्यादी रूपातील धन ती देते. ऋग्वेदातील श्रीसूक्ताचे ऋषी म्हणतात, ‘गजांनी केलेल्या जलाभिषेकाने लक्ष्मी प्रसन्न झाली की, भरपूर धान्य उगवेल आणि मग या जगातील दारिद्र्य, भूक अन् अस्वच्छतारूपी अलक्ष्मीचा मी नाश करीन.’
‘क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्।’ (श्रीसूक्त, ऋचा ८), म्हणजे ‘भूक-तहान आदी शारीरिक मलिनता धारण करणारी लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मी हिचा मी नाश करतो.’
आज संयुक्त राष्ट्रांचे एक मोठे ध्येय आहे ते, म्हणजे ‘जगातील प्रत्येकाला अन्न मिळावे.’ आपल्या लक्षात येईल की, वैदिक काळातील ऋषींची ही प्रार्थना त्याचाच संकल्प आहे. अलक्ष्मी रूपी तहान, भूक आणि अस्वच्छता यांचा नाश करण्यासाठी स्वच्छ पाणी अन् भरपूर अन्नधान्य लक्ष्मी आपल्याला देत आली आहे.
२. महालक्ष्मीची ८ रूपे
आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, राजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ही महालक्ष्मीची ८ रूपे मानली गेली आहेत. या नावांमधून मनुष्याचे वैभव काय असते, ते कळते. केवळ पैसा म्हणजे वैभव नाही, तर धान्य (पुरेसे अन्न असणे), पुत्र-पौत्र (चांगली संतान असणे), धैर्य, विद्या (कौशल्य असणे), विजय, यश या सगळ्याला ‘वैभव’ म्हटले आहे आणि लक्ष्मी या सर्व प्रकारचे वैभव देणारी माता आहे. अशा लक्ष्मीचे पूजन भारतातील सर्व पंथांनी केले. जैन आणि बौद्ध पंथातसुद्धा लक्ष्मी पूज्य मानली गेली.
३. लक्ष्मीची विदेशातील विविध रूपे
किमान २ सहस्र वर्षांपूर्वीपासून प्रवासी भारतियांसमवेत लक्ष्मीदेवीसह अनेक देवीदेवता भारताच्या बाहेर पोचल्या. चीनमध्ये लक्ष्मीदेवीला कुबेराची बहीण मानले गेले. चिनी बौद्ध पंथात शिव, इंद्र, ब्रह्म, सूर्य, चंद्र, यम, स्कंद, सरस्वती आदी २४ रक्षक देवता आहेत. त्यापैकी एक लक्ष्मी आहे. चीनमधील बौद्ध मंदिरांतून लक्ष्मीची स्तोत्रे गायली जातात. भारतात संस्कृतमध्ये लिहिले गेलेल्या ‘सुवर्ण प्रभास’ सूत्राचा चिनी आणि तिबेटी आदी भाषांत अनुवाद झाला. तो ग्रंथ ‘सूत्र ऑफ द गोल्डन लाईट’ या नावाने प्रसिद्ध आहे. या बौद्ध पुस्तकातील अनेक प्रार्थना लक्ष्मीला उद्देशून आहेत. २४ देवता राष्ट्राचे रक्षण करतात, अशी श्रद्धा असल्याने चीन, कोरिया आणि जपान या देशांत या सूत्रातील प्रार्थना म्हणल्या जात असत. जपानमध्येसुद्धा लक्ष्मीची पूजा केली जाते, इथे तिला ‘किशियोतेन’ म्हणतात.
आग्नेय आशियाई देशांमध्येही लक्ष्मीचे पूजन केले जात असे. इंडोनेशियामध्ये लक्ष्मीला ‘देवीश्री’ किंवा ‘श्रीदेवी’ म्हणतात. ही देवी धान्याची आणि मुख्य करून तांदळाची देवी मानली आहे. ‘श्रीदेवी’च्या एका हातात तांदळाचे पूर्ण दाणे भरलेले कणीस दाखवले जाते. जावामध्ये ‘देवीश्री’ला हिरवे, पांढरे किंवा सोनेरी वस्त्र नेसवले जाते. ‘पावसाळ्याच्या दिवसात श्रीदेवी पाऊस आणते’, अशी इथे मान्यता आहे.
३ अ. भारतासह काही देशांमध्ये चलनी नोटा आणि नाणी यांवर लक्ष्मीचे चिन्ह : धान्य देणारी भूदेवी हे लक्ष्मीचे एक रूप झाले. तिचे दुसरे रूप आहे ‘श्रीदेवी’. एका रूपाने लक्ष्मी आपल्याला धान्य देते आणि दुसर्या रूपाने भूमीतील खनिज, सोने – चांदी आदी धन देते. त्यामुळे लक्ष्मीचे चित्र नोटा आणि नाणी यांवरही दिसते. वर्ष १९५२ मध्ये इंडोनेशियाच्या १० रुपयांच्या नोटेवर श्रीदेवीच्या मूर्तीचे चित्र होते. भारतातसुद्धा अनेक राजांनी पाडलेल्या नाण्यांवर लक्ष्मीचे चिन्ह केले. मग ते राजे ग्रीक असोत, शक असोत वा हिंदू.
४. गायत्री मंत्रांमध्ये लक्ष्मीदेवीचा प्रसिद्ध गायत्री मंत्र
ॐ महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्।।
अर्थ : आम्ही देवी महालक्ष्मीला जाणतो आणि त्या विष्णु पत्नीचे ध्यान करतो. ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.
५. पृथ्वी रूपातील लक्ष्मीची रूपे
अ. पहिल्या पातळीवर पृथ्वीप्रमाणेच सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ इत्यादी ग्रह हे खनिजे देऊ शकणारी लक्ष्मीची रूपे आहेत. इतकेच काय, तर या अफाट विश्वात जे जे म्हणून ग्रह आहेत, ते ते सर्व लक्ष्मीचेच रूप आहेत. त्या महालक्ष्मीला मी जाणतो.
आ. दुसर्या पातळीवर लक्ष्मी, म्हणजे पृथ्वी, विष्णूची पत्नी. इथे विष्णु म्हणजे निळ्या रंगाचे अथांग आकाश. ज्यामध्ये सर्व ग्रहांना आधार मिळाला आहे. त्या पृथ्वी लक्ष्मीचे मी नित्य ध्यान करतो.
इ. येथील प्रत्येक जीव पृथ्वी-जल-अग्नी-वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून निर्माण झाला आहे; म्हणून आपल्या आतसुद्धा पृथ्वी अर्थात् लक्ष्मी आहे. ही तिसर्या पातळीवरील लक्ष्मी. ती लक्ष्मी मला प्रसन्न होवो. ती माझ्या बुद्धीला प्रेरणा देणारी ठरो ! मला आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ! लक्ष्मी मला प्रसन्न होवो !
श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महीयते।
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः।। – श्रीसूक्त, फलश्रुती
अर्थ : हे माते, मला ओज, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, विपुल धन, धान्य, पशूधन, वंशवृद्धी, तसेच १०० वर्षांचे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, ही प्रार्थना !
लेखिका : दीपाली पाटवदकर (‘देश-विदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’, या पुस्तकाच्या लेखिका)
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का केली जाते ?
दिवाळीच्या कालावधीत येणार्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्कि पुराणानुसार अलक्ष्मी कलि राक्षसाची दुसरी पत्नी असून अधर्म आणि हिंसा यांची मुलगी, तर मृत्यू अन् अधर्म यांची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ, वासना, असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार आणि अज्ञान यांची देवता आहे. कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल (हत्या) आणि लोभ या ठिकाणी रहाणे अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीची कथा आहे, तर श्रीसूक्तामध्ये ‘अलक्ष्मी नाश्याम्यहं’, म्हणजेच ‘अलक्ष्मीचा नाश व्हावा’, असे वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव आहे, तर तिच्या हातातील झाडू हे आयुध (शस्त्र) आहे. ती अलक्ष्मी घरात येऊ नये; म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. याच झाडूच्या साहाय्याने अलक्ष्मीला घरातून पळवून लावले जाते, अशी त्यामागची भावना आहे.
१. झाडूची पूजा कशी करावी?
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजन झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून त्याला हळद-कुंकू लावून पूजा करतात. पूजा झाल्यावर रात्री विलंबाने (उशिराने) नवीन झाडूने घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढतात.
२. झाडूचे महत्त्व
झाडूला पाय लावू नये. चुकून लागला, तरी लगेच नमस्कार करावा. झाडूने कुणालाही मारू नये. अगदी लहान मुले किंवा प्राणी यांनाही मारू नये. कुणी घराबाहेर पडले की, लगेच झाडलोट करू नये.
३. लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व
समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवर श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून सिद्ध केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग या दिवशी त्यांच्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून ‘चोपडा (वही) पूजन’ करतात, तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात.
(साभार : दैनिक ‘लोकमत’)