भारत ‘जीई’कडून दंड वसूल करणार !
नवी देहली – ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एच्.ए.एल्.) हे भारत सरकारचे आस्थापन भारतीय वायूदलासाठी ‘तेजस मार्क – १ए’ या लढाऊ विमानाची निर्मिती करत आहे. या विमानासाठी अमेरिकी आस्थापनाकडून इंजिन विकत घेण्यात येत आहेत. वर्षभरात १८ विमानांची निर्मिती होणे अपेक्षित असतांना या वर्षात केवळ दोनच विमानांची निर्मिती होऊ शकणार आहे. कारण अमेरिकी आस्थापनाकडून इंजिनचा पुरवठा होऊ शकलेला नाही. अमेरिकी आस्थापन ‘जनरल इलेक्ट्रिक’ (जीई) विमानांसाठी ‘एफ् ४०४’ नावाचे इंजिन पुरवणार आहे. या संदर्भात भारताने अनेकदा अमेरिकेसमोर सूत्र उपस्थित केले होते. आता या आस्थापनाकडून भारत दंड वसूल करणार आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनीही भारताला इंजिनचा पुरवठा पुन्हा चालू करण्याचे आश्वासन दिले आहे. जीईने आता पुढील वर्षी एप्रिलपासून या इंजिन्सचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वेगवेगळ्या वेळी अमेरिकी दौर्यात अमेरिकेसोबत इंजिन पुरवठ्यात विलंब झाल्याचे सूत्र उपस्थित केले होते.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने फेब्रुवारी २०२१ मध्ये ४८ सहस्र कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यात ८३ तेजस मार्क-१ए विमानांची मागणी दिली होती. आतापर्यंत एकाही विमानाचा पुरवठा करता आलेला नाही, तर करारानुसार पुरवठा मार्च २०२४ पर्यंत चालू व्हायला हवा होता.
राजकीय नाही, तर तांत्रिक कारण !
इंजिनचा पुरवठा न होण्याचे कारण राजकीय दबाव किंवा अन्य कोणतेही कारण नसून तांत्रिक कारणामुळे पूर्णत: पुरवठा होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या इंजिन्ससाठी दक्षिण कोरियाकडून उपकरणांची कमतरता हे एक कारण असल्याचे सांगितले जाते.