फोंडा (गोवा) येथील (कै.) किशोर घाटे (वय ७५ वर्षे) यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !

 मूळचे बेळगावचे आणि सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास असलेले (कै.) किशोर घाटे (वय ७५ वर्षे) यांचे २२.९.२०२४ या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता निधन झाले.  त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

‘किशोर घाटेकाका यांचे निधन होण्यापूर्वी २२.९.२०२४ या दिवशी दुपारी २ वाजता आम्ही त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. तेव्हा आणि तेथून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परत आल्यानंतर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) किशोर घाटे

१. रुग्णालयात गेल्यावर जाणवलेली सूत्रे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१ अ. यमदेवाने काकांवर पाश टाकून त्यांचे प्राण ओढण्याचा प्रयत्न करणे आणि त्यामुळे काकांना श्वास घेतांना त्रास होणे : दुपारी २ वाजता जेव्हा आम्ही रुग्णालयात गेलो, तेव्हा मला घाटेकाकांच्या खोलीतील खिडकीच्या बाजूला यमदेव दिसला. तो काकांवर पाश टाकून त्यांचे प्राण ओढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे काकांना स्थुलातून श्वास घेतांना त्रास होत होता. त्यांच्या स्थूलदेहावर मृत्यूची काळी छाया पडलेली दिसली.

१ आ. ‘त्यांच्या डोक्याच्या मागे सूक्ष्मातील चतुर्भुज श्रीविष्णूच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उभे आहेत आणि ते काकांकडे पहात आहेत’, असे मला जाणवले.

१ इ. काकांची कुलदेवी श्री महालसा नारायणी हिने काकांच्या कानांत ‘ॐ’ या बीजमंत्राचा उच्चार केल्यावर त्यांच्या देहात दैवी शक्ती अधिक प्रमाणात प्रवाहित होऊ लागणे : मला काकांची कुलदेवी श्री महालसा नारायणी हिचे अस्तित्व त्यांच्या उजव्या बाजूला आणि माझ्या शेजारी जाणवले. तेव्हा काका श्री महालसादेवीला म्हणाले, ‘हे महालसादेवी, किती वाट पहायला लावलीस ?’ त्यानंतर श्री महालसादेवीने स्मितहास्य करत काकांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांच्या कानात ३ वेळा ‘ॐ’ या बीजमंत्राचा उच्चार केला. त्यामुळे काकांच्या देहात दैवी शक्ती अधिक प्रमाणात प्रवाहित होऊ लागली.

२. रुग्णालयातून रामनाथी आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. काका श्री गणेशाचे उपासक होते. त्यामुळे श्री गणेशाने त्यांच्या कुंडलिनीमार्गातील अडथळे दूर केले आणि त्यांच्या मूलाधारचक्रातील कुंडलिनी प्रवाहित करून तिला ऊर्ध्व, म्हणजे वरच्या दिशेने नेले.

आ. त्यानंतर ‘ते काही घंट्यांचे सोबती आहेत आणि त्यांच्या नातेवाइकांना बोलावून घ्यायला हवे’, असा विचार माझ्या मनात आला.

इ. ‘काकांचे नाभीस्थित प्राण वरच्या दिशेने सरकू लागले आणि सायंकाळी ५.४५ वाजता ते त्यांच्या डोळ्यांवाटे बाहेर पडले’, असे मला जाणवले.

त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता काकांची नात कु. मानसी प्रभु हिने मला भ्रमणभाषद्वारे कळवले की, काकांचे सायंकाळी ५.४५ वाजता निधन झाले.

३. रुग्णालयातील देवघरात श्री गणेशाची मूर्ती आणि श्री महालसादेवीचे चित्र असल्याने काकांच्या लिंगदेहाला आध्यात्मिक ऊर्जा मिळून त्यांचा मृत्यू सुकर होणे

काकांवर कुलदेवी श्री महालसादेवी आणि उपास्य देव श्री गणेश यांची कृपा असल्यामुळे त्यांचा मृत्यू सुकर झाला. योगायोगाने त्यांना ज्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते, तेथील स्वागतकक्षातील देवघरात मध्यभागी श्री गणेशाची मूर्ती आणि तिच्या उजव्या बाजूला श्री महालसादेवीचे चित्र ठेवले होते. त्यामुळे ‘या देवतांनी घाटेकाकांच्या लिंगदेहाला आध्यात्मिक ऊर्जा देऊन त्यांचा मृत्यू सुकर करणे आणि मृत्यूत्तर सद्गती मिळणे’, यांसाठी काकांच्या लिंगदेहाला साहाय्य मिळाले. यावरून ‘रुग्णालयात देवघर असणे आध्यात्मिकदृष्ट्या किती आवश्यक आणि महत्त्वाचे आहे !’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.

४. काकांचे प्राण त्यांच्या देहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत असतांना श्री महालसादेवी आणि श्री गणेश यांच्यासह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून साहाय्य करणे

काका रुग्णाईत असतांना त्यांचा कधी शिव, कधी गणेश, तर कधी ‘प.पू. डॉक्टर’, हा नामजप चालू होता. त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. त्यामुळे जेव्हा काकांचे प्राण त्यांच्या देहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत होते, तेव्हा श्री महालसादेवी आणि श्री गणेश यांच्यासह त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सूक्ष्म रूपाने साहाय्य केले. काकांचा प्राण देहातून बाहेर पडत असतांना तो प्राण गुरुमाऊलीने स्वतःच्या ओंजळीत घेतला आणि तो त्यांच्या देहातून बाहेर काढला अन् काकांची प्राणज्योत वरच्या दिशेने नेली. तेव्हा मला सूक्ष्मातून मोगर्‍याचा सुगंध आला.

५. काकांचे प्राण देहातून बाहेर पडल्यानंतर जाणवलेली सूत्रे

अ. काकांचे प्राण त्यांच्या देहातून बाहेर पडल्यावर ते स्वर्गलोकात पोचले.

आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सूक्ष्म रूप काकांना म्हणाले, ‘तुम्ही गणेशभक्ती केल्यामुळे तुमचे पुष्कळ पुण्य आहे; परंतु आपल्याला स्वर्गसुखात अडकायचे नाही. त्यामुळे आपण पुढे जाऊया.’

इ. काकांची आंतरिक साधना चालू असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या अंतर्मनातून ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप चालू होता. त्यामुळे त्यांचे संपूर्ण उत्तरदायित्व गुरुमाऊलीने घेतले होते. त्यांची उर्वरित साधना पूर्ण होईपर्यंत गुरुमाऊली काकांची प्राणज्योत घेऊन उच्च स्वर्गलोकातील श्री देवगुरु बृहस्पती यांच्या आश्रमात थांबणार आहेत.

यावरून ‘विष्णुस्वरूप गुरुदेवांचे केवळ पृथ्वीवरीलच नव्हे, तर ब्रह्मांडातील साधना करणार्‍या प्रत्येक जिवाकडे पूर्ण लक्ष आहे’, असे मला जाणवले.

कृतज्ञता

घाटेकाका अत्यंत प्रेमळ आणि आनंदी व्यक्तीमत्त्व होते. मला त्यांचा नेहमी आधार वाटत असे. त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर देवतांसह गुरुमाऊलीने त्यांची पुष्कळ काळजी घेतली. यावरून ‘देवता आणि गुरुदेव यांच्यामध्ये किती प्रीती असते !’, हे सूक्ष्म स्तरावर मला अनुभवायला मिळाले’, याबद्दल मी सर्व देवता अन् गुरुमाऊली यांच्या चरणी लक्ष लक्ष कृतज्ञता अर्पण करते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखन करण्याचा दिनांक अन् वेळ : १३.९.२०२४, सकाळी १०.३० ते ११.१०)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.