ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘राज्यशास्त्र’ या विषयात ‘एम्.ए.’ची पदवी संपादन केली आहे, तसेच त्या विद्यावाचस्पतीसुद्धा, म्हणजेच ‘पीएच्.डी.’ आहेत. त्या अधिवक्त्यासुद्धा आहेत. उत्तम वक्त्या म्हणून त्यांचा लौकिक आहे. सडेतोड बोलण्यात त्यांचा हात धरणारी अन्य महिला निदान महाराष्ट्रात तरी आढळणार नाही, असा त्यांचा लौकिक आहे. थोडक्यात त्या विदुषी अन् उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांच्या पदव्या पाहिल्या, तर त्यांच्याविषयी कुणाच्याही मनात आदराची भावना सहजतेने निर्माण होईल, यात शंका नाही. सध्या त्यांच्या व्याख्यानाची एक छोटीशी ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्या व्याख्यानात त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्यासारख्या बहुश्रुत आणि अभ्यासू असलेल्या विदुषीने श्रीकृष्णाचा केलेला अपमान त्यांच्या विद्वत्तेविषयी संशय निर्माण होण्यास पुरेसा आहे.
१. विद्वत्तेचा स्वतःच पंचनामा करणे, अशी विद्वत्ता वंदनीय नव्हे !
उच्चविद्याविभूषित व्यक्ती तिच्या विद्वत्तेच्या आणि वक्तृत्वाच्या बळावर जर श्रद्धास्थानांवर आघात करून आपल्या विद्वत्तेचा स्वतःच पंचनामा करत असेल, तर ती विद्वत्ता वंदनीय मानता येणार नाही, तसेच ती अनुकरणीय सुद्धा नाही. ‘त्यांनी केलेले वक्तव्य हे कोणत्याही परिस्थितीत सभ्यतेला, सुसंस्कृततेला धरून आहे’, असे म्हणता येत नाही. त्यांनी त्यांच्या व्याख्यानात ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।’ (अर्थ : जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते (म्हणजे लोक धर्माचरण करत नाहीत) आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो.), हा भगवद्गीतेतील श्लोक उद्धृत केला. त्याचा अर्थ सुयोगपणे कथन केला; पण त्यावर भाष्य करतांना मात्र त्यांचा वैचारिक, बौद्धिक, मानसिक तोल गेला आणि परिणामी त्यांची वाणी घसरली.
२. ‘वक्ता कसा असू नये’, हे सिद्ध करणार्या सुषमा अंधारे !
‘धर्मावर आघात झाला आणि धर्म बुडण्याची वेळ आली की, भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात; पण सांप्रत काळात तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असूनही भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला नाही; कारण त्यांना असंख्य गोपी आहेत. त्यापैकी एखाद्या गोपीसमवेत ते ‘डेट’वर गेले असावेत’, असे उद्गार काढून त्यांनी ‘वक्ता कसा असू नये’, हे स्वतःच सिद्ध केले आहे.
३. श्रीकृष्णाला ‘व्यभिचारी’ ठरवून अवमानित करणे, हे बुद्धी भ्रष्ट झाल्याचे लक्षण !
भूतलावर केव्हा अवतार घ्यायचा, हे भगवान श्रीकृष्ण स्वतः ठरवतात. त्यासाठी सुषमा अंधारे यांच्या इच्छेनुसार भगवंत अवतार घेणार नाहीत, हे एवढेसुद्धा या विदुषीच्या ध्यानात येऊ नये, याचे नवल वाटते. एवढेच नाही, तर श्रीकृष्णाने आता अवतार घेतला नाही, याचे कारण स्वतःच ठरवतांना श्रीकृष्णाला त्यांनी ‘व्यभिचारी’ ठरवून अवमानित केले आहे.
श्रीकृष्ण ज्या गोपींच्या प्रेमात पडले किंवा ज्या गोपी श्रीकृष्णाच्या प्रेमात पडल्या त्या सर्व गोपींचे वय श्रीकृष्णाच्या मातेसमान होते. माता आपल्या मुलावर प्रेम करते, त्याला ‘वात्सल्य’ असे म्हणतात. ती एक पवित्र आणि शुद्ध भावना आहे. त्या पवित्र आणि शुद्ध भावनेला विकृत स्वरूपात लोकांसमोर प्रकट करतांना या विदुषीला ‘आपण काहीतरी भयंकर चूक करत आहोत, हेसुद्धा लक्षात आले नाही, इतकी बुद्धी भ्रष्ट झाली आहे’, असेच म्हणावे लागेल. दुसरे अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे गोकुळात वास्तव्य होते, ते त्यांच्या वयाच्या १५ वर्षापर्यंत. त्यानंतर ते मथुरेत गेले. गोकुळातून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण आयुष्यात भगवान श्रीकृष्ण कधीही गोकुळात गेले नाहीत. हे सुषमा अंधारे यांना ठाऊक नाही.
४. सुषमा अंधारे यांचे इस्लामविषयीचे बेगडी प्रेम
हिंदु धर्म, संस्कृती, हिंदूंची श्रद्धास्थाने यांच्यावर आघात करून हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडवणे, यालाच सध्या ‘पुरोगामी विचारसरणी’ असे संबोधले जाते. हिंदु धर्माविषयीची द्वेषभावना त्यांच्या वक्तव्यातून विशेषत्वाने आढळून येते. मुसलमान समाजाविषयी मात्र त्यांच्या मनात नितांत आदर आहे. हा आदर हिंदु धर्माविषयी व्यक्त करतांना सुषमा अंधारे यांना कदाचित् लाज वाटत असावी. एकदा व्याख्यान देत असतांना त्यांच्या कानावर नमाजाची अजान पडली. त्या वेळी त्यांनी व्याख्यान देण्याचे थांबवले. अजान संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला प्रारंभ केला. त्यांच्या वर्तनातील हा भेदभाव लक्षात येण्यासारखा आहे.
५. ‘श्रोते मूर्ख वा दगड आहेत’, असे समजणार्या सुषमा अंधारे !
भगवद्गीतेचा अभ्यास करत असतांना त्यांनी त्या समवेत जर महाभारताचे परिशीलन केले असते, तर त्यांनी जे उद्गार काढले, तसे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले नसते; पण त्यासाठी बुद्धी शुद्ध आणि पवित्र असावी लागते; पण त्याचीच वानवा जाणवते. ‘वक्ता कसा असावा’, हे आपल्याला महाभारतात सांगण्यात आले आहे. ‘वक्त्याने आपल्यासमोर बसलेले श्रोते हे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात् नारायण आहेत, देवदेवेश आहेत, असे समजून बोलावे’, असे महाभारताने सांगून वक्त्याने कोणती काळजी घेऊन बोलावे, ते स्पष्ट केले आहे.
अलीकडे चांगला वक्ता व्हायचे असेल, तर समोर बसलेले श्रोते मूर्ख आहेत, दगड आहेत, असे समजून बोलायला प्रारंभ करावा, असे सांगितले जाते. यालाच ‘आदर्श’ समजून महाभारतातील मार्गदर्शनाकडे पाठ फिरवून व्याख्यान देणारे अनेक वक्ते सध्या आढळतात. अशा वक्त्यांपैकीच आपणही एक वक्ता आहोत, असे सुषमा अंधारे यांनी स्वतःच सिद्ध केले आहे.
६. सुषमा अंधारे यांचे वक्तव्य विकृतीसमवेत वाटचाल करणारे !
विद्वत्तेचे प्रतीक, म्हणजे सुशीलता आहे. ती विद्वानाच्या वर्तनातून आणि बोलण्यातून प्रकट झाली पाहिजे, तरच तो खरा विद्वान अन् वंदनीय ठरतो. सुषमा अंधारे यांना या गोष्टीचा विसर पडला असावा. वक्ता शांत आणि संयमी असला पाहिजे. सुसंस्कार करण्याच्या हेतूने वक्त्याने स्वतःचे विचार मांडले पाहिजेत. म्हणून वक्ता विवेकी असला पाहिजे; कारण जिथे विवेक असतो तिथे विकृतीला कोणतेही स्थान नसते. सुषमा अंधारे यांनी केलेले वक्तव्य किंवा त्यांनी केलेले विधान विवेकाची कास धरणारे नसून विकृतीसमवेत वाटचाल करणारे आहेत.
७. …हा श्रीकृष्णाचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न !
भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पुतना मावशी गोकुळात गेली होती; पण तिला श्रीकृष्णाला ठार मारता आले नाही. श्रीकृष्णाचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांनी त्यांच्या व्याख्यानातून केला आहे. पुतना मावशीची वृत्ती आणि सुषमा अंधारे यांची वृत्ती यांत विशेष भेद आढळत नाही; म्हणून सुषमा या विदुषी आहेत कि पुतना मावशी ? असे उद्गार जर कुणाच्या मुखातून निघाले, तर कुणालाही संताप येण्याचे कारण नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१२.१०.२०२४)