‘२०.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘छिन्नमस्ता यागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. यागाच्या परिसरात पूजेत सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र ठेवले होते. यागाच्या वेळी त्यातून लाल रंगाची मारक शक्ती तेथे उपस्थित असलेल्या साधकांच्या दिशेने प्रक्षेपित होत होती. त्यामुळे साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले.
२. यज्ञकुंडातून सोनेरी रंगाचे दैवी कण वातावरणात प्रक्षेपित होत होते. हे दैवी कण वातावरणातील वाईट शक्तींच्या काळ्या रंगाच्या कणांना नष्ट करत होते.
३. यज्ञकुंडातून सूक्ष्मातून एक देवी यज्ञवेदीपासून १ फूट वर आली. तिच्या हातात एक कमळाची कळी होती. जेव्हा देवी त्या कळीचा देठ तिच्या बोटांत धरून पुढे-मागे करायची, तेव्हा त्या कळीतून वातावरणात तेजाशी संबंधित दैवी कणांची निर्मिती होऊन ते सर्वत्र पसरायचे. त्यामुळे वातावरणातील रज-तमाचे प्रमाण न्यून व्हायचे.
४. यज्ञकुंडातून देवीची शक्ती दूर अंतरावर पसरायची. त्यामुळे निसर्गावरील रज-तमाचा प्रभाव न्यून व्हायचा; परिणामी वातावरणाची शुद्ध व्हायची.
५. यज्ञवेदीपासून १ फूट उंचीवर सोनेरी रंगाची देवीची दोन यंत्रे सिद्ध झाली. त्यांतून सोनेरी रंगाचे किरण वातावरणात प्रक्षेपित होत होते. हे दृश्य मला सूक्ष्मातून सूर्यकिरणांप्रमाणे दिसत होते.
६. यज्ञकुंडातून एक सोनेरी रंगाचे सुदर्शनचक्र वेगाने वर आले आणि ते आश्रमाच्या परिसरात फिरू लागले. त्या सुदर्शनचक्राचा आकार कधी लहान, तर कधी मोठा होत होता आणि ते वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध करत होते. तेव्हा ‘सुदर्शनचक्राचा आकार कार्यानुरूप पालटत असतो’, असा विचार माझ्या मनात आला.
७. यज्ञवेदीपासून १ फूट उंचीवर मला मातीच्या भांड्याप्रमाणे एक दैवी कुंभ दिसला. तो कुंभ हिरव्या रंगाच्या ३ पानांनी सुशोभित होता. ती पाने आंब्याच्या पानांप्रमाणे दिसत होती. तो अग्निदेवतेचा कुंभ असल्याने त्याला ‘अग्निकुंभ’, असे म्हटले आहे. त्यात अग्निदेवाचे तेज सामावलेले होते. त्या कुंभातून वातावरणात तेजोलहरी प्रक्षेपित होत होत्या.
हे दृश्य पाहिल्यावर मला पौराणिक कथेतील देव आणि असुर यांनी केलेल्या समुद्रमंथनाची गोष्ट आठवली. ‘ज्याप्रमाणे समुद्रमंथन चालू असतांना समुद्रातून विविध दैवी घटक बाहेर आले होते, त्याप्रमाणे याग चालू असतांना यज्ञकुंडातून विविध दैवी घटक बाहेर येत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.
८. साधक मंत्र म्हणत असतांना आरंभी यज्ञकुंडातून ईश्वरी शक्तीची निर्मिती व्हायची आणि मंत्राचा शेवट झाल्यावर ती वातावरणात प्रक्षेपित व्हायची.
९. यागात अंतिम टप्प्यातील मंत्र चालू असतांना यज्ञवेदीपासून अर्धा मीटर उंचीवर पांढर्या रंगाचा दैवी प्रकाश निर्माण झाला. त्यानंतर मला त्या प्रकाशात सूक्ष्मातून एका देवीचे दर्शन झाले.
१०. ‘यागाच्या शेवटी लघुपूर्णाहुती स्वीकारण्यासाठी यज्ञकुंडातून स्वतः ‘अग्निनारायण’ आणि त्याची पत्नी ‘स्वाहा’ वर आले आहेत’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. यापूर्वी यागाचे सूक्ष्म परीक्षण करतांना मला केवळ अग्निनारायणाचेच दर्शन होत होते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२३)
|