चैतन्य आणि संकल्प शक्ती यांच्या बळावर लीलया कार्य करून साधकांना घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २००७ पासून शारीरिक आजारपण आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे माझी प्राणशक्ती न्यून होऊ लागली. त्यामुळे मला खोलीच्या बाहेर पडणेही अशक्य झाले. तेव्हा ‘साधकांच्या साधनेतील अडचणी आता कोण सोडवणार ?’, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हे दायित्व समर्थपणे सांभाळायला चालू केले.

अध्यात्मात ‘आज्ञापालन’ हा गुण अत्यंत महत्त्वाचा असून तो सर्व गुणांचा राजा आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात ‘आज्ञापालन’ हा गुण पुरेपूर असून ‘तळमळ’, ‘साधकांवरील निरपेक्ष प्रीती, कार्यमग्नता आणि ईश्वराशी अनुसंधान’ या गुणांद्वारे त्यांनी साधकांच्या साधनेचे दायित्व लीलया सांभाळले आणि आजही सांभाळत आहेत. साधकांच्या साधनेतील अडचणी सोडवतांना त्या स्थुलातून अचूक दृष्टीकोन देऊन साधकाला आधार देतातच; पण त्याचसमवेत त्यांचा संकल्प आणि तळमळ यांमुळे साधकाला सूक्ष्मातूनही अडथळे दूर झाल्याची अन् पुढील दिशा मिळाल्याची अनुभूती येते. म्हणजे आता त्यांचे कार्य स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर होत आहे.

‘प्रीती, नेतृत्व, नियोजनकौशल्य आणि साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, ही अखंड तळमळ’ असल्याने त्या साधकांना झपाट्याने घडवत आहेत. मागील ८ वर्षांपासून त्या सर्व साधकांसाठी भक्तीसत्संग घेत आहेत. त्यांच्या चैतन्यमय सत्संगामुळे अनेक साधकांना लाभ होत असून त्यांना आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती येत आहेत.

‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होत असते’, याचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्या सर्व साधक आणि संत यांच्या समोर व्यष्टी अन् समष्टी साधनेचा आदर्श आहेत. अशा सर्वांगांनी परिपूर्ण असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त अनेक, अनेक शुभेच्छा !’

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.९.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.