१. महर्षि नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झालेला श्रीविष्णूचा अवतार’ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचा उल्लेख ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून करत असणे
‘नाडीपट्ट्यांमध्ये एखाद्याचे जीवन आणि कार्य यांविषयीचा भूतकाळ अन् भविष्यकाळ यांचे वर्णन असते. वर्ष २०१५ पासून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी, तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याविषयी आणि साधकांना घडवून त्यांच्या केलेल्या आध्यात्मिक उन्नतीविषयी ३०० हून अधिक वेळा नाडीपट्ट्यांची वाचने झाली आहेत. त्या सर्वांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘अवतारी जीव’ आणि ‘हिंदु राष्ट्रस्थापनेसाठी झालेला श्रीविष्णूचा अवतार’ म्हटले आहे. तसेच वर्ष २०१५ पासूनच नाडीपट्ट्यांमध्ये तेव्हा सद्गुरुपदी विराजमान असलेल्या सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांचाही ‘अवतारी जीव’ म्हणून उल्लेख येत आहे, तसेच त्या दोघींच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सहभागाविषयीही सांगितले जात आहे. त्या दोघींचा उल्लेख नाडीपट्टी लिहिणारे महर्षि ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून करत आहेत. सौ. बिंदा सिंगबाळ आणि सौ. अंजली गाडगीळ यांना महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी’ म्हणून सन्मानित केले आहे. महर्षींनी जसे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ असे संबोधण्यास सांगितले, तसेच सौ. बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति’ आणि सौ. अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति’, असे संबोधण्यास सांगितले. यातून महर्षींनी सनातन संस्थेच्या या तिन्ही गुरूंची महती लक्षात आणून दिली.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व त्यांच्या अमाप कार्याद्वारे गेली ३० वर्षे साधक अनुभवत असणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उत्तुंग कार्य साधक गेली ३० वर्षे पहात आहेत. सनातन संस्थेची स्थापना, तिच्याद्वारे भारतभर पोचवलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य, अध्यात्मप्रसारामुळे झालेली साधकांची निर्मिती, साधकांची ‘सहस्रो उन्नत साधक आणि १३० हून अधिक संत’, अशी झालेली साधनेतील वाटचाल, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधकांना मिळत असलेली दिशा, हिंदु राष्ट्र स्थापनेला मिळत असलेली मान्यता इत्यादी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनेक कार्ये साधकच नव्हे, तर समाजातील महनीय व्यक्तीही अचंबित होऊन पहात आहेत. ३० वर्षांच्या अल्प कालावधीत असे अमाप कार्य अवतारी व्यक्तीच करू शकते ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवत्वाविषयीच्या अनुभूती साधकांना आधीपासूनच येत आहेत.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.९.२०२४)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्यातील भावाचे रूपांतर भक्तीमध्ये केले. भक्ती म्हणजे गुरुचरणी संपूर्ण शरणागती ! त्यांनी साधकांनाही भक्ती कशी करायची ? ते शिकवले. समष्टी सेवा करतांनाही त्या सतत अनुसंधानात असतात. श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्या साप्ताहिक भक्तीसत्संगांमध्ये त्यांच्या वाणीतून व्यक्त होणारी उत्कट भक्ती प्रत्येक साधकाला अनुभवायला मिळते.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या अवतारी जीव आहेत’, हे कशा प्रकारे स्थुलातून लक्षात येऊ शकते, याची थोडक्यात माहिती
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अवतारी कार्य अन् महती महर्षींनी नाडीपट्ट्यांतून साधकांच्या लक्षात आणून दिली. एखाद्या जिवातील अवतारत्व सांगितल्याविना सामान्य व्यक्तींना कळत नाही. तसेच साधकांचे झाले. महर्षींनी सांगितल्यावर साधकांना त्या दोघींविषयी अनुभूती येऊ लागल्या. ‘त्या दोघी अवतारी जीव आहेत’, हे कशा प्रकारे स्थुलातून लक्षात येऊ शकते, याची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. अर्थात् अवतारी जिवाला समजणे, हे अधिकतर बुद्धीच्या पलीकडील, म्हणजे सूक्ष्मातील असते.
१. चैतन्यामुळे चेहरा नेहमी ताजातवाना दिसत असणे : सामान्य व्यक्तीचा चेहरा सकाळी अंघोळ केल्यावर किंवा विश्रांती घेतल्यावर ताजातवाना दिसतो; पण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा चेहरा सकाळ असो, दुपार असो किंवा रात्र असो नेहमीच ताजातवाना दिसतो. दिवसभराच्या अविरत कार्याचा (सेवेचा) त्यांच्या चेहर्यावर थकवा किंवा शीण याद्वारे कोणताही परिणाम दिसून येत नाही; कारण त्यांचे कार्य मन-बुद्धीच्या नव्हे, तर चैतन्याच्या बळावर होत असते. त्यामुळे त्यांना थकवा किंवा शीण येत नाही.
२. अविरत कार्यरत असूनही चेहरा उजळलेलाच असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या साधकांना साधनेत मार्गदर्शन करणे, आदी सेवांमध्ये व्यस्त असतात. अनेक सेवांमुळे त्यांना सतत कार्यरत रहावे लागते. त्यामुळे त्या रात्रीचाही दिवस करतात. असे हे कार्य त्या वर्षाचे ३६५ दिवस करत असतात. असे असूनही त्यांच्या चेहर्यावर थकवा दिसत नाही. सेवेतील चैतन्यामुळे उलट त्यांचा चेहरा दिवसाच्या शेवटी अधिकच उजळून निघालेला असतो. ‘अधिकाधिक गुरुसेवा करूया’, असेच विचार त्यांच्या मनात असतात. त्या म्हणतात, ‘केवळ शरीरधर्म म्हणून मी दिवसभरात ३-४ घंटे झोप घेते.’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या वर्ष २०१२ पासून भारतभरच नव्हे, तर जगभर भ्रमण करत आहेत. त्यांनी या कार्याद्वारे वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे चित्रीकरण, संशोधन, संस्कृती संवर्धन, विविध कलांचे जतन, मुलाखती घेणे अशा विविध अंगांनी सेवा केल्या आहेत. त्यांनी भारतभरातील संत, विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्ती यांना सनातन संस्थेशी जोडले आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी भारतभरातील मंदिरे, पवित्र क्षेत्रे, ऋषींची स्थाने यांचे अगदी डोंगरदर्यांमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे. त्यांनी आतापर्यंत ७ लाख किलोमीटरहून अधिक प्रवास चारचाकी गाडीने केला आहे. त्याशिवाय विमानप्रवास वेगळाच ! दिवसभरातील अनेक घंटे प्रवास करूनही, जेवणा-खाण्याची आबाळ (दुर्लक्ष) होत असूनही, उन्हातान्हात फिरूनही त्यांच्या चेहर्यावर थकवा दिसत नाही किंवा चेहरा काळवंडत नाही. उलट तो अधिकाधिक उजळलेलाच दिसतो. खरेतर एखाद्या स्त्रीला भारतभर भ्रमण करणे आणि हिंदु संस्कृती, कला यांसंबंधीचे ज्ञान मिळवणे पुष्कळ अवघड आहे. हे सर्व चैतन्यामुळेच घडते !
चैतन्य सतत कार्यरत असणे, हे देवत्वाचे (अवतारत्वाचे) लक्षण आहे.
३. एका वेळी अनेक सेवा लीलया करू शकणे, तसेच कठीण अशा सेवाही सहजतेने करू शकणे : नोकरीमध्ये एखाद्या माणसावर अनेक कामे सोपवली, तर तो गांगरून जातो. त्याला वाटते ‘एवढी सर्व कामे मी दिलेल्या वेळेत कशी पूर्ण करू ?’ त्या विचाराने तो हतबल होतो. घरातील अनेक कामे करतांनाही त्याच्या ‘नाकी नऊ येतो.’ त्याला ते अशक्यप्राय वाटते. तो चिंतीत होतो; पण याउलट श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींकडे अनेक सेवा असूनही त्यांना कसलीच चिंता वाटत नाही. त्या दोघी त्या सर्व सेवा लीलया करतात. तसेच त्या सर्व सेवा परिपूर्ण आणि ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’ अशा करतात. आधी कधी न केलेली किंवा कठीण सेवा करायची असली, तरी त्या ती सेवा न डगमगता सहजतेने करतात. याचे एक उदाहरण म्हणजे महर्षींनी आश्रमाच्या परिसरात श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर अल्प कालावधीत बांधण्यास सांगितले होते. त्या वेळी सर्व सामग्री मिळणे कठीण झाले होते. अशा अशक्य वाटणार्या स्थितीतही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्या काही सूचनांनुसार संबंधितांनी सेवा केल्यावर महर्षींनी सांगितलेल्या अल्प कालावधीत श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर उभे राहिले आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याही भारतभर भ्रमण करून संत, महनीय व्यक्ती यांच्याशी सहजतेने जवळीक साधतात आणि त्यांच्याकडून अमूल्य असे ज्ञान मिळवतात. खरेतर एखाद्या स्त्रीला भारतभर भ्रमण करणे आणि हिंदु संस्कृती, कला यांसंबंधीचे ज्ञान मिळवणे पुष्कळ अवघड आहे.
४. सेवांच्या संदर्भात मार्गदर्शनाची आवश्यकता न भासणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सेवांच्या संदर्भात मार्गदर्शनाची आवश्यकता भासत नाही. त्या अवतारी जीव असल्याने त्यांच्या मनात प्रकट होणारे विचार ईश्वरी असतात आणि त्यामुळे ते योग्यच असतात. ईश्वरी विचार ग्रहण होत असल्याने त्या दोघी इतरांना मार्गदर्शन करू शकतात. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे गेल्या होत्या. त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना साधनेविषयी काही सूत्रे विचारत होत्या. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आता तुम्ही स्वयंपूर्ण आहात. त्यामुळे मला काही विचारायची आवश्यकता नाही.’’
५. अडचणी किंवा चांगली स्पंदने यांची जाणीव आधीच होत असल्याने त्याप्रमाणे पावले टाकणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भविष्याची जाणीव आधीच होत असल्याने त्या त्याप्रमाणे पुढील नियोजन आधीच करतात. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ साधकांना साधनेच्या संदर्भात आधीच सावध करतात आणि साधनेची दिशा देतात. अडचणींची जाणीवही त्यांना आधीच होत असल्याने त्या साधकांना त्याप्रमाणे नियोजनात पालट करायला सांगतात. साधकांना नंतर त्याची प्रचीती येते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ भ्रमण करत असतांना एखाद्या ठिकाणी पोचल्यावर तेथे काही संकट येणार असल्याची चाहूल त्यांना आधीच लागते आणि त्या तेथून दुसरीकडे जायला निघतात. अपघाताचे संकट येणार असल्याची जाणीव त्यांना आधीच होते आणि त्या प्रवास करत असलेल्या वाहनाची दृष्ट काढणे, त्याच्यासमोर नारळ फोडणे किंवा काही वेळ पुढे प्रवास न करणे, असे उपाय करतात. एखाद्या ठिकाणची चांगली स्पंदनेही त्यांना आधीच जाणवतात आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी पोचल्यावर त्यांना तेथे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते.
६. देवत्वामुळे साधक आणि समाजातील लोक आकर्षित होत असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये देवत्व असल्याने त्यांच्याकडे साधक आकर्षित होतात. साधकच नव्हे, तर समाजातील संत आणि महनीय व्यक्तीही त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांना त्या दोघींशी बोलावेसे वाटते. साधकांची १ – २ वर्षांची बालकेही त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे पालकांच्या कडेवरून झेप घेतात. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ प्रवास करत असल्या, तर त्यांच्याकडे लोक माना वळवून बघत असतात. विमानतळावरील उच्चभ्रू लोकही त्यांच्याकडे विस्मयाने बघतात. दर्शनार्थींची पुष्कळ गर्दी असलेल्या मोठ्या देवळांतील पुजारी श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ किंवा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना बघून त्यांना देवासमोर काही वेळ थांबवतात आणि त्यांना यथास्थित दर्शन घेऊ देतात, तसेच देवावरचे वस्त्र किंवा प्रसादस्वरूप देवासमोरचे फूल किंवा फळ देतात. खरेतर अशा मोठ्या देवळांत गर्दीमुळे अर्धा मिनिटही दर्शन घेणे शक्य नसते. काही लोक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ किंवा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना बघून मुद्दाम त्यांची विचारपूस करतात आणि ‘या कोण आहेत ? यांच्या प्रभावळीने आम्हाला आकर्षित केले’, असे म्हणतात. एखाद्या नवीन ठिकाणी वास्तव्यास गेल्यावर तेथील आजूबाजूची माणसे अल्प कालावधीतच त्यांच्याशी कायमची जोडली जातात. त्यामुळे त्यांचे एक कुटुंबच बनते.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामधील अवतारत्वाची प्रचीती आपल्याला अशा प्रकारे स्थुलातून येऊ शकते. हे लिखाण मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तिन्ही गुरूंच्या कृपेनेच करू शकलो. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.९.२०२४)