डोंबिवली, ठाणे येथील शास्त्रीय गायक पं. संजय मराठे हे २.४.२०२२ ते ४.४.२०२२ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात वास्तव्यास होते. या दरम्यान त्यांचे शास्त्रीय गाण्याचे विविध रागांचे प्रयोग घेण्यात आले. या प्रयोगादरम्यान सद्गुरु (डॉ). मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण देत आहोत.
१. पं. संजय मराठे यांनी गायलेल्या रागांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
१. राग – सामंत सारंग
अ. ‘पं. संजय मराठे ‘सामंत सारंग’ राग गाऊ लागल्यावर माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला. गायनाला आरंभ झाल्यावर माझी सुषुम्ना नाडी लगेच कार्यरत झाल्यामुळे ‘श्री. संजय मराठे यांच्या गायनातून उच्च स्तराची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, हे लक्षात आले.
आ. पं. मराठे गात असतांना ‘आपण चैतन्याच्या सागरातच आहोत’, असे मला जाणवू लागले.
इ. सामंत सारंग राग ऐकत असतांना अचानक माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला. कारण ‘सामंत सारंग रागातून श्रीरामाचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने तो राग ऐकत असतांना माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला’, हे लक्षात आले.
२. राग – चंद्रकंस
अ. चंद्रकंस रागाच्या गायनाला आरंभ केल्यावर मला माझ्या विशुद्धचक्रावर स्पंदने जाणवू लागली आणि थोड्याच वेळात मला माझ्या सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागली.
आ. मला अचानक दत्तगुरूंची आठवण आली. चंद्रकंस रागामध्ये दत्ततत्त्व ७० टक्के असल्याने ‘मला अचानक दत्तगुरूंची आठवण का आली ?’, याचे कोडे उलगडले.
इ. चंद्रकंस रागामधून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याने मला शक्तीची स्पंदने जाणवत होती.
३. राग – रामकली
अ. पं. संजय मराठे यांनी गायनाला आरंभ करण्यापूर्वी मला त्या कक्षामध्ये दाब जाणवत होता; परंतु पं. मराठे यांच्या चैतन्यमय गायनामुळे वातावरणातील त्रासदायक स्पंदने अल्प होत जाऊन शेवटी पूर्णपणे नाहीशी झाली.
आ. पं. संजय मराठे यांनी रामकली रागाच्या गायनाला आरंभ केल्यावर त्या रागातून प्रक्षेपित होत असलेली चांगली स्पंदने माझ्या आज्ञाचक्रावर जाणवू लागली.
इ. पं. मराठे खर्जातील स्वर आळवू लागल्यावर मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली.
ई. मला वातावरणात शिवतत्त्व जाणवू लागले. रामकली हा राग सकाळच्या प्रहरी गायला जातो. सकाळी आपण देवाचे नामस्मरण करतो. ‘या रागातील देवता श्रीराम ही तिची आराध्य देवता ‘शिव’ हिचे नामस्मरण करत असल्याने मला वातावरणात रामतत्त्व न जाणवता शिवतत्त्व जाणवले’, असे लक्षात आले. नंतर कळले, ‘श्री. संजय मराठे हेही शिवभक्त आहेत आणि तेही गातांना शिवाचे स्मरण करत असावेत.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.९.२०२४)
|