Gyanvapi Belongs Only Hindus : ज्ञानवापी परिसर ओरडून सांगत आहे की, हा हिंदूंचा परिसर आहे ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

नवी देहली – ज्ञानवापीच्‍या परिसरात १६ मे २०२२ या दिवशी शिवलिंग प्राप्‍त झाले होते. ज्ञानवापी परिसर ओरडून सांगत आहे की, हा हिंदूंचा परिसर आहे. ज्ञानवापीच्‍या परिसरात बळजोरीने नमाजपठण केले जात होते, हे अत्‍यंत चुकीचे आहे.

ज्ञानवापीमध्‍ये हिंदूंचे आराध्‍य दैवत महादेवाचे स्‍थान आहे. हिंदूंच्‍या १२ ज्‍योतिर्लिंगापैकी हे एक स्‍थान आहे. आमचा न्‍यायव्‍यवस्‍थेवर विश्‍वास आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागेल, अशी आम्‍हाला आशा आहे, असे वक्‍तव्‍य ज्ञानवापीच्‍या प्रकरणात हिंदूंच्‍या बाजूने लढणारे सर्वोच्‍च न्‍यायालयाने अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी केले.

अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन पुढे म्‍हणाले,

१. ‘ज्ञानवापी हे साक्षात् श्री विश्‍वनाथाचे धाम आहे. असे असतांना ज्ञानवापीला ‘मशीद’ म्‍हणणे दुर्दैवी आहे’, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केले होते. या विधानाचे मी स्‍वागत करतो.

२. मथुरा येथील श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या परिसरात सर्वेक्षण केले जावे, अशी आमची मागणी असून त्‍यासाठी आम्‍ही अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे. ही याचिका उच्‍च न्‍यायालयाने स्‍वीकारली आहे. या याचिकेला सर्वोच्‍च न्‍यायालयान आव्‍हान देण्‍यात आले होते.

३. श्रीकृष्‍णजन्‍मभूमीवर ज्‍या वेळी सर्वेक्षण करण्‍यात येईल, त्‍या वेळी हा परिसर ईदगाह मशीद नाही, हे सर्वांच्‍याच लक्षात येईल. आमच्‍या देवतेचा परिसर अवैधरित्‍या कह्यात घेऊन त्‍याला मशिदीचे स्‍वरूप देण्‍याचा प्रयत्न केला गेला.

वक्‍फने बळकावलेल्‍या भूमीची चौकशी व्‍हावी ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

जी भूमी वक्‍फची भूमी म्‍हणून कह्यात घेण्‍यात आली आहे, ती भूमी परत मिळवण्‍याची प्रक्रिया फार कठीण आहे. अशा प्रकरणांमध्‍ये चौकशीचा आदेश देण्‍याचा अधिकार जिल्‍हाधिकार्‍यांना देण्‍यात आला आहे. जिल्‍हाधिकारी कुणाच्‍या आदेशानुसार काम करतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. भारतात वक्‍फ बोर्डाकडे जेवढी संपत्ती आहे, त्‍याची चौकशी होण्‍यासाठी राष्‍ट्रीय स्‍तरावर आयोग स्‍थापन करावा, अशी आमची मागणी आहे. वक्‍फ बोर्डाने मोठ्या प्रमाणात भूमी बळकावली आहे. ही भूमी त्‍याच्‍या मूळ मालकांना देणे आवश्‍यक आहे.